लोकांना दिलासा देण्यासाठी कर्जमाफी योजना – मुख्यमंत्री
११ ऑगस्ट, २०२६
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सरकार ‘बहुजन हिताय बहुजन सुखाय’ या तत्त्वावर काम करते आणि म्हणूनच ते नेहमीच सर्वसामान्यांच्या हिताचे रक्षण करते असे सांगितले. गोवा राज्य अनुसूचित जाती आणि इतर मागासवर्गीय वित्तीय विकास महामंडळ लि. मार्फत कर्ज घेतलेल्या, परंतु ते वसूल करू न शकलेल्या आणि अनेक वर्षांपासून कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या लोकांना दिलासा देण्यासाठी सरकारने कर्जमाफी योजना राबविण्याचा पुढाकार घेतला आहे असे ते म्हणाले. आज शहरातील मिनेझीस ब्रागांझा संस्थेत गोवा राज्य अनुसूचित जाती आणि इतर मागासवर्गीय वित्तीय विकास महामंडळ लि. द्वारे आयोजित कर्जमाफी प्रमाणपत्र वितरण कार्यक्रमात ते बोलत होते.
मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सरकारने व्यवसायासाठी आर्थिक सहाय्य योजना राबविली असून, त्यायोगे ओबीसी, एससी आणि इतर समाजाचे आर्थिक सक्षमीकरण साध्य झाले आहे असे सांगितले. त्यानी सरकार विविध सरकारी खात्यांमार्फत बहुजन समाजाच्या हितासाठी विविध सामाजिक कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी करीत आहे असे सांगितले. राबविण्यात आलेल्या कर्जमाफी योजनेचा उद्देश, गंभीर आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या एससी, ओबीसी, दिव्यांगजन आणि सफाई कर्मचारी यांसारख्या उपेक्षित समाजामधील दीर्घकाळ थकबाकीदार असलेल्या लाभार्थ्यांना आर्थिक दिलासा देणे हा आहे . त्यांचा भार हलका करण्याच्या उद्देशाने त्यांना वसुलीचे विविध पर्यायही उपलब्ध करून देण्यात आले आहेत असेही ते म्हणाले.
पुढे बोलताना मुख्यमंत्र्यांनी बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठी आर्थिक सहाय्य देण्याकरिता ‘मुख्यमंत्री बहुजन उत्कर्ष योजना’ नावाच्या आणखी एका कल्याणकारी योजनेची घोषणा केली.
समाजकल्याण मंत्री श्री सुभाष फळदेसाई यांनी आपल्या भाषणात सरकार समाजातील प्रत्येक घटकाच्या कल्याणासाठी कटिबद्ध आहे असे सांगितले. सरकार धोरणे तयार करताना प्रत्येक घटकाचा विचार करते, जेणेकरून विकासाच्या बाबतीत कोणीही मागे राहणार नाही. समाजकल्याण खाते समाजातील दुर्बळ घटकांच्या सक्षमीकरण आणि विकासासाठी विविध योजना राबविते असे ते म्हणाले.
श्री. फळदेसाई यांनी सरकारच्या कर्जमाफी योजनेमुळे कर्जाचा बोजा निश्चितच कमी होईल आणि त्यांना दिलासा मिळेल असे सांगून या प्रयत्नात सहकार्य केल्याबद्दल त्यांनी मुख्यमंत्र्यांचे कौतुक केले.
गोवा राज्य अनुसूचित जाती आणि इतर मागासवर्गीय वित्तीय विकास महामंडळ लिमिटेडचे अध्यक्ष श्री दयानंद मांद्रेकर यांनी यावेळी बोलताना, ४९० लाभार्थ्यांना कर्जाच्या ओझ्यातून मुक्त करून ही कर्जमाफी योजना राबविण्यासाठी सरकारने दिलेल्या सहकार्याबद्दल त्यांचे आभार मानले.
त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी लाभार्थ्यांना कर्जमाफी प्रमाणपत्रे आणि गृह सुरक्षा योजनेचे आदेश वितरित केले.
जलस्त्रोत मंत्री श्री सुभाष शिरोडकर, गोवा राज्य अनुसूचित जाती आणि इतर मागासवर्गीय वित्तीय विकास महामंडळ लि. चे व्यवस्थापकीय संचालक श्री दीपेश प्रियोळकर, समाज कल्याण संचालक श्री दीपक देसाई, गोवा राज्य अनुसूचित जाती आणि इतर मागासवर्गीय वित्तीय विकास महामंडळ लि. च्या संचालक मंडळाचे सदस्य आणि इतर या कार्यक्रमाला उपस्थित होते.
मा/वाप/अहे/एपी/रना/२०२६/५१५
