बार्ज मालकांना प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे आवाहन
५ जून, २०२६
बंदर कप्तान खात्याने सर्व बार्ज मालक, वॉटरस्पोर्ट्स बोटींचे मालक, डॉक्स, जहाज दुरुस्ती व उत्पादन यार्ड, होडी मालक आणि इतर सर्व बोट मालकांना पावसाळ्यात मलेरिया, डेंग्यू आणि चिकुनगुनिया यांसारख्या कीटकजन्य रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी खालील प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. पावसाचे पाणी साचल्यामुळे डासांच्या प्रजननाच्या जागा वाढतात आणि त्यामुळे पावसाळ्यात या रोगांचे प्रमाण सामान्यतः वाढते.
बार्जच्या मालकांनी, कप्ताननी बार्जच्या मालवाहू कप्प्यात पावसाचे पाणी साचणार नाही याची खबरदारी घ्यावी. अशा प्रकारे जमा झालेले पाणी बार्जमधून नियमितपणे काढून टाकले पाहिजे, बार्ज आणि इतर अंतर्गत जहाजांच्या मालकांनी, कप्ताननी फेंडर म्हणून वापरल्या जाणाऱ्या टायर्समध्ये पाणी साचणार नाही, यासाठी सर्वात सोपा मार्ग म्हणजे टायर्सच्या तळाशी छिद्र पाडणे, जेणेकरून टायर्समधील पाणी बाहेर वाहून जाईल, इतर लहान जहाज, होड्या, जलक्रीडा बोटींच्या मालकांनी पावसाळ्यात आपली जहाजे ताडपत्रीने व्यवस्थित झाकून ठेवावीत आणि वापरात नसताना पावसाळ्यात आपली जहाजे, बोटी उलट्या ठेवाव्यात, जेणेकरून जहाजात पावसाचे पाणी साचणार नाही. जहाजात साचलेले पाणी नियमितपणे काढून टाकले पाहिजे, बार्ज आणि इतर जहाजांच्या मालकांनी ट्रॉलर्स, जहाजांवर किंवा जेट्टीवर काम करण्यासाठी नेमलेल्या मजुरांची मलेरियासाठी तपासणी करावी आणि त्यांच्यासाठी आरोग्य सेवा संचालनालयाकडून आरोग्य कार्ड मिळवावे. डॉक्स, जहाज निर्मिती, दुरुस्ती यार्डच्या मालकांनी कार्यशाळेत, डॉक्समध्ये काम करणाऱ्या मजुरांची मलेरियासाठी तपासणी करावी.
मा/वाप/अहे/एपी/रना/२०२६/३७३
