Latest NewsMarathi Press ReleasePress Releases

राष्ट्रीय डेंग्यू दिवस संपन्न

१५ मे २०२६

आज वास्को येथील गोवा शिपयार्ड लिमिटेडच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये ‘राष्ट्रीय डेंग्यू दिवस पाळण्यासाठी’ राज्यस्तरीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आरोग्य सेवा संचालनालयाच्या राष्ट्रीय वेक्टर बोर्न डिसीज नियंत्रण कार्यक्रम, वास्को येथील आयुष्मान आरोग्य मंदिर शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र आणि गोवा शिपयार्ड लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या प्रसंगी गोवा शिपयार्ड लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक श्री ब्रिजेश कुमार उपाध्याय, सडा येथील सरकारी उच्च माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका एडना मोल्स डायस इराणी, राष्ट्रीय वेक्टर बोर्न डिसीज नियंत्रण, आरोग्य सेवा विभागाच्या उपसंचालक श्रीमती कल्पना महात्मे, वैद्यकीय अधिकारी श्रीमती पूनम वेर्णेकर, संपर्क अधिकारी डॉ. राजेंद्र काणेकर आणि इतर उपस्थित होते.

गोवा शिपयार्ड लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक, श्री ब्रिजेश कुमार उपाध्याय यांनी डासांच्या प्रजननापासून बचाव करण्यासाठी लोकांना आपल्या सभोवतालची नियमितपणे पाहणी करावी, आपले घर, कामाची जागा आणि सार्वजनिक ठिकाणे जबाबदारीने स्वच्छ ठेवावीत असे आवाहन केले आहे.

श्री उपाध्याय यांनी जेव्हा जागरूकता सवयीत रूपांतरित होते, सहभाग लोकचळवळीत बदलतो आणि प्रतिबंध अधिक मजबूत व प्रभावी होतो, तेव्हा समाज सर्वांसाठी अधिक निरोगी आणि सुरक्षित भविष्याच्या दिशेने वाटचाल करतो असे सांगितले. त्यांनी आरोग्य सेवा संचालनालयाच्या कर्मचारी आणि डॉक्टरांचे कौतुक केले.

आरोग्य सेवा संचालनालयाच्या कार्यावर प्रकाश टाकत डॉ. कल्पना महात्मे यांनी माहिती दिली की, खात्याने गोव्यात डेंग्यू नियंत्रणासाठी अनेक उपाययोजना राबविल्या आहेत, ज्यामध्ये नियमितपणे प्रादुर्भाव कमी करण्याची मोहीम, डासांच्या प्रजननाच्या जागा तपासण्यासाठी घरोघरी भेटी, ताप सर्वेक्षण आणि डेंग्यू प्रतिबंध व नियंत्रणाबद्दल जनजागृती करण्यासाठी समुदाय व शाळांमध्ये पत्रके व माहितीपत्रकांचे व्यापक वितरण करण्याची माहिती दिली.

आयोजकांनी आयोजित केलेल्या पोस्टर स्पर्धा आणि रील स्पर्धेच्या विजेत्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पारितोषिके वितरित करण्यात आली.

डेंग्यूचा प्रादुर्भाव नियंत्रित करण्याच्या आणि कमी करण्याच्या धोरणांवर भर देण्यासाठी दरवर्षी १६ मे रोजी राष्ट्रीय डेंग्यू दिवस पाळला जातो. या वर्षीची संकल्पना “डेंग्यू नियंत्रणासाठी सामुदायिक सहभाग: तपासा, स्वच्छ करा आणि झाका” ही आहे. या दिवसाच्या निमित्ताने राज्यभरात जनजागृती उपक्रम राबविण्यात आले.

मा/वाप/अहे/एपी/रना/२०२६/३२३

Skip to content