राष्ट्रीय अग्निशमन सेवा दिनानिमित्त अग्निशमन दलाच्या जवानांना आदरांजली आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणा अधिक मजबूत.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याहस्ते अत्याधुनिक अग्निशमन उपकरणांचे उद्घाटन आणि अग्निशमन कर्मचाऱ्यांचा सत्कार .
१४ एप्रिल २०२६
पणजी सांतीनेज येथील अग्निशमन दलाच्या प्रशिक्षण मैदानावर राष्ट्रीय अग्निशमन सेवा दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात अग्निसुरक्षा, पूर्वतयारी आणि जीवित व मालमत्तेच्या संरक्षणातील अग्निशमन दलाच्या महत्त्वपूर्ण भूमिकेवर प्रकाश टाकण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात अग्निशमन दलाच्या जवानांच्या संचलनाने झाली. त्यानंतर कर्तव्य बजावत असताना प्राण गमावलेल्या अग्निशमन जवानांच्या स्मरणार्थ पुष्पहार अर्पण करून दोन मिनिटांचे मौन पाळण्यात आले. अग्निशमन दलाच्या जवानांना त्यांच्या अनुकरणीय सेवेबद्दल प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले आणि अग्निशमन व आपत्कालीन सेवा संचालक श्री नितीन व्ही. रायकर यांना त्यांचे पीएच.डी. प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. अत्याधुनिक अग्निशमन उपकरणे आणि आधुनिक बचाव साधनांच्या प्रदर्शनाचेही उद्घाटन करण्यात आले.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी “जीव वाचवण्यासाठी पूर्वतयारी हीच गुरुकिल्ली आहे असे सांगितले. त्यांनी “गोवा सरकार राज्यभरातील अग्निशमन आणि आपत्कालीन सेवा अधिक मजबूत करण्यासाठी कटिबद्ध आहे असेही सांगितले. ते पुढे म्हणाले, “दुर्गम भागांमध्ये जलद प्रतिसाद देण्यासाठी सांगे आणि धारबांदोडा येथे नवीन अग्निशमन केंद्रे उभारली जात आहेत. त्यांनी समन्वित सेवांसाठी ईआरएसएस ११२ आपत्कालीन प्रतिसाद प्रणालीच्या अंमलबजावणीवरही प्रकाश टाकला. पायाभूत सुविधा, समन्वय आणि क्षमता बांधणी मजबूत करणे हे सरकारचे प्रमुख प्राधान्य असल्याचे त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी समन्वय आणि कार्यक्षमता वाढवण्यासाठी उत्तर गोवा, दक्षिण गोवा आणि कुशावती येथे विभागीय अग्निशमन नियंत्रण कक्ष स्थापन केले जातील अशी माहिती दिली. त्यांनी क्षमता बांधणी अधिक मजबूत करण्यासाठी सध्याच्या प्रशिक्षण सुविधेचे राज्य अग्निशमन प्रशिक्षण अकादमीमध्ये श्रेणीवर्धन केले जाईल असेही सांगितले. आपत्कालीन प्रतिसादात सामुदायिक सहभाग वाढवण्यासाठी आपदा मित्र आणि सखी’ यांसारख्या उपक्रमांचाही उल्लेख करण्यात आला, तर चित्रकला आणि निबंध स्पर्धांसारख्या जनजागृती उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांमध्ये अग्निसुरक्षेला प्रोत्साहन देण्यात आले.
या कार्यक्रमाला मुख्य सचिव डॉ. व्ही. कंदवेलू (आयएएस),अग्निशमन आणि आपत्कालीन सेवा संचालक श्री नितीन व्ही. रायकर, वरिष्ठ अधिकारी, अग्निशमन दलाचे कर्मचारी, आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
मा/वाप/ दिबा/एपी/र ना/ २०२६/२४३
