मुख्यमंत्र्यांहस्ते गोव्यात ‘तारे जमीन पर’ बस सुरू
१५ एप्रिल २०२६
गोव्यातील शिक्षण हे केवळ शैक्षणिक बाबींपुरते मर्यादित न राहता, विद्यार्थ्यांना कुशल, आत्मविश्वासू आणि भविष्यासाठी सज्ज करणारे असले पाहिजे असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. शाळांमधील अनुभवात्मक शिक्षणाला बळकटी देण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल टाकत, गोवा सरकारने कुंभारजुवा येथील पी.एम. श्री स्कूलमधून “तारे जमीन पर” मोबाईल एसटीईएम आणि डिजिटल प्लॅनेटेरियम बसला हिरवा झेंडा दाखवून उपक्रमाला सुरवात केली. राज्यभरातील विद्यार्थ्यांपर्यंत थेट संवादात्मक आणि प्रत्यक्ष कृतीतून विज्ञान शिक्षण पोहोचवणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.
या फिरत्या युनिटमध्ये एक फुगवता येणारे डिजिटल तारांगण आहे, जे थेट शाळांमध्ये खगोलशास्त्र आणि अवकाश विज्ञानाचे अनुभवात्मक कार्यक्रम सादर करील. यामध्ये सुटसुटीत एसटीईएम आणि विज्ञान प्रयोग संचांचाही समावेश आहे, ज्यामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कृतीतून शिकता येईल आणि वैज्ञानिक संकल्पनांचे व्यावहारिक आकलन होईल. हा उपक्रम राज्यभरातील सरकारी आणि अनुदानित शाळांमध्ये राबविला जाईल, ज्यामुळे प्रगत शैक्षणिक साधनांची उपलब्धता होईल.
यावेळी उपस्थितांसमोर बोलताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी हा उपक्रम शिक्षणाला पारंपरिक पद्धतींच्या पलीकडे नेऊन आपल्या विद्यार्थ्यांसाठी जिज्ञासा, नवनिर्मिती आणि शोधाचे नवीन मार्ग खुले करतो असे सांगितले. राज्याच्या दूरदृष्टीवर जोर देत त्यांनी “गोव्यातील शिक्षण हे केवळ शैक्षणिक बाबींपुरते मर्यादित न राहता, आत्मविश्वासू, कुशल आणि भविष्यासाठी सज्ज व्यक्ती घडविणारे असले पाहिजे असे ते म्हणाले.” त्यांनी हा कार्यक्रम इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना संवादात्मक सहभागातून वैज्ञानिक दृष्टिकोन, सर्जनशीलता आणि चिकित्सक विचारांना प्रोत्साहन देऊन लाभ देईल असेही ते म्हणाले.
व्यापक दृष्टिकोनावर प्रकाश टाकत मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी, एक संरचित करिअर शिक्षण कार्यक्रम सुरू करण्यासाठी गोवा राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद आणि अंतरंग फाउंडेशन यांच्यात सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आल्याची माहिती दिली. यामुळे उच्च वर्गातील विद्यार्थ्यांना माहितीपूर्ण करिअर निवड करण्यास आणि भविष्यातील संधींसाठी तयार होण्यास मदत होईल.
या कार्यक्रमाला शिक्षण सचिव श्री प्रसाद लोलयेकर, आमदार श्री राजेश फळदेसाई, शिक्षण संचालक श्री शैलेश झिंगडे, गोवा राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या संचालिका श्रीमती मेघना शेटगावकर, कुंभारजुवा येथील पी. एम. श्री शाळेचे प्राचार्य, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.
मा /वाप/ दिबा/ एपी/ र ना/२०२६/ २४६
