जागतिक पर्यावरण दिनानिमित्त गोव्याच्या महत्त्वाकांक्षी ‘ग्रीन एनएच ६६ मिशन’चा शुभारंभ होणार.
पत्रादेवी ते गालजीबाग असा ७० किमीचा ग्रीन कॉरिडॉर तयार करण्यासाठी ‘एक पेड माँ के नाम’ अंतर्गत मेगा वृक्षारोपण मोहीम
४ जून, २०२६
पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत विकासाप्रती आपली वचनबद्धता कायम ठेवत, गोवा सरकार जागतिक पर्यावरण दिनी ५ जून २०२६ रोजी, सकाळी ११:३० वाजता, पणजी येथील केटीसीएल बस स्थानकासमोर ‘ग्रीन एनएच ६६ मिशन’चा शुभारंभ करणार आहे. देशव्यापी ‘एक पेड माँ के नाम’ अभियानाशी सुसंगत असलेल्या या उपक्रमाचे उद्दिष्ट, उत्तर गोव्यातील पत्रादेवी ते दक्षिण गोव्यातील गालजीबाग पर्यंत पसरलेल्या एनएच ६६ च्या सुमारे ७० किलोमीटरच्या भागाला, महामार्गाच्या दुभाजकांवर आणि रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करून ‘ग्रीन कॉरिडॉर’मध्ये रूपांतरित करणे असा आहे. याचा शुभारंभ मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याहस्ते होईल.
निवडलेल्या १० ठिकाणी टप्प्याटप्प्याने राबविण्यात येणाऱ्या या अभियानाचा उद्देश, गोव्याच्या महामार्ग जाळ्याचे दृश्यात्मक आकर्षण वाढविणे, तसेच पर्यावरणीय शाश्वतता, हवामान कृती, कार्बन उत्सर्जन रोखणे, मृदा स्थिरीकरण आणि वाहनांच्या हेडलाइट्सचा प्रखर प्रकाश कमी करणे यांमध्ये योगदान देणे हा आहे. हा उपक्रम राज्यभरात अधिक हरित सार्वजनिक जागा निर्माण करणे आणि पर्यावरणीय लवचिकता बळकट करण्याच्या व्यापक दृष्टिकोनाचे प्रतिबिंब आहे.
या मोहिमेअंतर्गत अनेक सरकारी खाते, संस्था, स्वयंसेवक आणि स्थानिक हितधारक एका संयुक्त प्रयत्नाखाली एकत्र येतात. वन खाते प्रत्येक वृक्षारोपण स्थळी १,००० रोपे आणि पणजी येथील प्रक्षेप स्थळी २,००० रोपे पुरविणार, तर शिक्षण खाते आणि उच्च शिक्षण संचालनालय वृक्षारोपण कार्यात साहाय्य करण्यासाठी स्वयंसेवकांना संघटित करतील. कृषी खाते, गोवा कचरा व्यवस्थापन महामंडळ, गृह खाते, गोवा राज्य जैवविविधता मंडळ आणि इतर खाती वृक्षारोपण साहाय्य, जनजागृती उपक्रम, स्वच्छता मोहीम, वाहतूक व्यवस्थापन, सुरक्षा व्यवस्था आणि रोपांसाठी पाणीपुरवठ्याव्दारे योगदान देतील.
जागतिक पर्यावरण दिनाच्या कार्यक्रमात जीएसपीसीबीच्या २०२५-२६ च्या वार्षिक अहवालाचे प्रकाशन, तसेच कचरा व्यवस्थापन तंत्रज्ञ व्यवसायासाठी दुहेरी प्रशिक्षण प्रणालीच्या अंमलबजावणीकरिता गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ, गोवा कचरा व्यवस्थापन महामंडळ आणि काकोडा सरकारी औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांच्यात सामंजस्य कराराची देवाणघेवाण यांचाही समावेश असेल. या कार्यक्रमात पोस्टर स्पर्धा, पर्यावरणविषयक प्रश्नमंजुषा स्पर्धांसाठी पारितोषिक वितरण, उद्योग आणि खात्यांद्वारे राबविण्यात आलेल्या सर्वोत्तम पर्यावरण पद्धतींचा गौरव, जीएसबीबी पुरस्कारांचे सादरीकरण, आणि ग्रीनको रेटिंग प्रमाणपत्रांसाठी कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री यांचा सत्कार यांचाही समावेश असेल.
या कार्यक्रमाला भारत सरकारचे ऊर्जा आणि नवीनीकरणीय ऊर्जा राज्यमंत्री, श्री श्रीपाद नाईक, सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित असतील तर सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री दिगंबर कामत, गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचे (जीएसपीसीबी) अध्यक्ष, डॉ. लेविन्सन जे. मार्टिन्स, आयएएस, जीएसपीसीबीच्या सदस्य सचिव, डॉ. गीता एस. नागवेंकर आणि पर्यावरण व हवामान बदल संचालक, श्री सचिन एस. देसाई उपस्थित राहणार आहेत.
मा/वाप/अहे/एपी/रना/२०२६/३६९
