जन्म आणि मृत्यू नोंदणी आता सीआरएस पोर्टलवर
२ जुलै २०२६
गृह मंत्रालयाच्या भारतीय रजिस्ट्रार जनरल यांनी गोवा राज्य जन्म आणि मृत्यू नोंदणी संबंधित कामकाज पार पाडण्यासाठी १ जुलै २०२६ पासून विद्यमान राज्य पोर्टलवरून केंद्रीय नागरी नोंदणी प्रणाली पोर्टलवर स्थलांतरित होत असल्याचे कळविले आहे.
स्थलांतर प्रक्रियेअंतर्गत, राज्य पोर्टलवर १९७१ पासून ३० जून २०२६ पर्यंत उपलब्ध असलेली जन्म आणि मृत्यूची विद्यमान माहिती केंद्रीय सीआरएस पोर्टलमध्ये समाविष्ट केली जाईल. ज्या नोंदी केंद्रीय सीआरएस पोर्टलवर यशस्वीरित्या स्थापित आणि समाविष्ट केल्या जातील त्या जन्म आणि मृत्यू नोंदणीशी संबंधित विविध नागरिक सेवा मिळविण्यासाठी केंद्रीय सीआरएस पोर्टलवर उपलब्ध असतील. अशा नोंदी राज्य पोर्टलवर स्थगित केल्या जातील आणि प्रमाणपत्रे व इतर संबंधित सेवा केवळ केंद्रीय सीआरएस पोर्टलद्वारेच प्रदान केल्या जातील.
सध्याचे राज्य पोर्टल केवळ अशा नोंदींसाठी जन्म आणि मृत्यू प्रमाणपत्रे जारी करण्याकरिता उपलब्ध राहील, ज्या अद्याप केंद्रीय सीआरएस पोर्टलवर पाठविण्यात आलेल्या नाहीत. तथापि १ जुलै २०२६ पासून राज्य पोर्टलवर नवीन जन्म आणि मृत्यू नोंदणी केल्या जाणार नाहीत.
केंद्रीय सीआरएसद्वारे जारी केलेली जन्म आणि मृत्यू प्रमाणपत्रे, भारतीय रजिस्ट्रार जनरल यांनी विहित केलेल्या आणि देशभरात लागू असलेल्या एकसमान स्वरूपात असतील. तथापि ज्या नोंदी अद्याप केंद्रीय सीआरएस पोर्टलवर प्रकाशित/स्थलांतरित व्हायच्या आहेत त्यांच्यासाठी विद्यमान राज्य पोर्टलद्वारे जारी केलेली प्रमाणपत्रे राज्य पोर्टलच्या विद्यमान स्वरूपातच दिली जात राहतील आणि ती केंद्रीय सीआरएस पोर्टलद्वारे जारी केलेल्या प्रमाणपत्रांपेक्षा भिन्न असू शकतात.
मा/वाप/अहे/एपी/रना/२०२६/४१८
