मडगाव येथे देशभक्तीच्या उत्साहात गोवा क्रांती दिन साजरा
१८ जून, २०२६
मडगाव येथील लोहिया मैदानावर आयोजित कार्यक्रमात देशभक्तीच्या उत्साहात गोवा क्रांती दिन साजरा करण्यात आला. सार्वजनिक बांधकाम मंत्री, श्री. दिगंबर कामत यांनी पोर्तुगीज वसाहतवादी राजवटीविरुद्ध गोव्याच्या स्वातंत्र्य चळवळीत शौर्याने लढलेल्या स्वातंत्र्यसैनिकांना आणि हुतात्म्यांना आदरांजली वाहिली.
श्री. दिगंबर कामत यांनी गोवा क्रांती दिनाचे महत्त्व प्रतिपादून वसाहतवादी राजवटीविरुद्ध स्वातंत्र्यासाठी लढण्याकरिता लोकांच्या मनात स्फूर्ती निर्माण करण्यात डॉ. राम मनोहर लोहिया यांनी १९४६ साली पोर्तुगीज सत्तेविरूध्द लढण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली असे सांगितले. तरुण पिढीने या महान स्वातंत्र्यसैनिकांनी केलेल्या त्यागातून प्रेरणा घेऊन देशभक्ती, एकता आणि राष्ट्राप्रती समर्पण या मूल्यांचे पालन करणे आवश्यक आहे. गोवा मुक्तीनंतरही अनेक स्वातंत्र्यसैनिकांनी सुरू ठेवलेल्या समाजसेवेचा त्यांनी विशेष उल्लेख केला. स्वातंत्र्यसैनिक गुरुनाथ केळेकर यांनी स्थापन केलेली रस्ता सुरक्षेसाठी समर्पित ‘एनजीओ मार्ग’ ही त्यापैकीच एक असल्याचे त्यांनी नमूद केले.
प्रधानमंत्री श्री. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश एका उज्ज्वल भविष्याकडे वाटचाल करीत आहे आणि प्रत्येक क्षेत्रात विकास साधत आहे. पंतप्रधानांच्या पावलावर पाऊल ठेवत, आमचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, २०३७ पर्यंत राज्याला ‘विकसित गोवा’ बनविण्याच्या उद्देशाने गोव्याच्या उन्नतीसाठी अथक परिश्रम घेत आहेत असे श्री. कामत म्हणाले.
पुढे बोलताना श्री. कामत यांनी ‘म्हाजे घर योजने’सारख्या विविध कल्याणकारी योजनांची वाढती लोकप्रियता ही लोकांच्या कल्याणाप्रती सरकारची वचनबद्धता पुन्हा एकदा दिसून येते आणि सरकारवरील लोकांचा विश्वास व आत्मविश्वास दृढ होत असल्याचे सांगितले.
स्वातंत्र्य सैनिक बाल संघटनेचे अध्यक्ष श्री. अविनाश शिरोडकर यांनी स्वातंत्र्य सैनिकांच्या मुलांच्या उन्नतीसाठी सरकारने केलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले. त्यांनी विद्यार्थ्यांना स्क्रीन टाइम कमी करून अभ्यास आणि शारीरिक हालचालींवर अधिक लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन केले.
आमदार श्री. आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स आणि श्री. उल्हास तुयेंकर, दक्षिण गोव्याच्या जिल्हाधिकारी श्रीमती एग्ना क्लीटस (आयएएस), पोलीस अधिक्षक श्री. टिकम सिंग वर्मा, माजी केंद्रीय मंत्री श्री. एदुआर्द फालेरो, स्वातंत्र्यसैनिक श्री. वसंत नाईक आणि इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.
कार्यक्रमानंतर परिसरातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते सादर केली.
मा/वाप/अहे/एपी/रना/२०२६/३८९
