Latest NewsMarathi Press ReleasePress Releases

तरुणांनी स्वातंत्र्य सैनिकांकडून प्रेरणा घेतली पाहिजे- शिरोडकर

१८ जून २०२६

जलस्त्रोत मंत्री सुभाष शिरोडकर यांनी गोव्याच्या स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानाचे स्मरण करण्याची गरज असल्याचे सांगून तरुणांना तंत्रज्ञानाच्या युगात नाविन्य आणि सर्जनशीलता आत्मसात करताना देशभक्तीची मूल्ये जपण्याचे आवाहन केले.

फोंडा येथील क्रांती मैदानावर आयोजित गोवा क्रांती दिनाच्या कार्यक्रमात बोलताना श्री शिरोडकर यांनी तरुण पिढीने स्वातंत्र्य चळवळीतील संघर्ष समजून घेतला पाहिजे आणि गोव्याच्या समृद्ध वारशाचा अभिमान बाळगला पाहिजे असे सांगितले. त्यांनी स्वातंत्र्यापूर्वीच्या काळात पूर्वजांनी जुवारी नदीपलीकडील कामाक्षी आणि रायेश्वर यांसारख्या मंदिरांचे रक्षण करून राज्याचा सांस्कृतिक वारसा जपला होता असे नमूद केले.

राष्ट्रध्वज फडकविल्यानंतर स्वातंत्र्य सैनिकांना आणि हुतात्म्यांना आदरांजली वाहून मंत्री श्री शिरोडकर यांनी प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत अधिक समृद्ध आणि विकासाच्या दिशेने वाटचाल करीत आहे असे सांगितले.

कार्यक्रमास फोंडाचे नगराध्यक्ष श्री वीरेंद्र ढवळीकर, ६ टीटीआरचे कमांडिंग अधिकारी श्री शंतनू कौशिक, अतिरिक्त जिल्हाधिकारी श्री विशाल कुंडईकर, नगरसेवक, अधिकारी व नागरिक उपस्थित होते.

या कार्यक्रमात फोंडा तालुक्यातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी सादर केलेली देशभक्तीपर गीते आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे उत्सवात रंगत आणि उत्साह वाढला.

सुरवातीस जलस्त्रोत मंत्री श्री शिरोडकर आणि इतर मान्यवरांनी हुतात्मा स्मारकावर पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.

क्रांती मैदानावर आगमन झाल्यावर जलस्त्रोत मंत्र्यांचे स्वागत अतिरिक्त जिल्हाधिकारी श्री विशाल कुंडईकर आणि उप जिल्हाधिकारी श्री अमितेश शिरवईकर यांनी केले.

गिरीश वेळगेकर यांनी सूत्रसंचालन केले.

मा/वाप/अहे/एपी/रना/२०२६/३८९

Skip to content