‘सहकार सेवा भवन’चे उद्घाटन “गोव्यामध्ये सर्वसमावेशक विकास आणि सामुदायिक विकासाच्या सर्वात मजबूत स्तंभांपैकी एक सहकार चळवळ – डॉ. प्रमोद सावंत
१८ जून २०२६
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोव्याच्या सहकारी क्षेत्राची संस्थात्मक चौकट बळकट करण्याच्या उद्देशाने आज तिसवाडीतील मेरशी येथे सहकारी संस्थांच्या निबंधकांचे मुख्यालयाच्या नव्याने स्थापन झालेल्या ‘सहकार सेवा भवन’चे उद्घाटन केले. या नवीन सुविधेमुळे प्रशासकीय कार्यक्षमता वाढेल आणि राज्यभरात कार्यरत असलेल्या सहकारी संस्थांना सुधारित सेवा मिळतील अशी अपेक्षा आहे.
सहकारी प्रशासनासाठी एक समर्पित केंद्र म्हणून स्थापित हे नवीन कार्यालय इंडो-पोर्तुगीज स्थापत्य वारशाचे दर्शन घडविणाऱ्या एका जीर्णोद्धार केलेल्या सरकारी मालकीच्या इमारतीत आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याने सुमारे रुपये २.४० कोटीं खर्चून ही सुविधा उपलब्ध केली आहे.
यावेळी उपस्थितांसमोर बोलताना, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी राज्याच्या विकासासाठी गोव्याच्या सहकारी संस्थांच्या योगदानाची प्रशंसा केली आणि या क्षेत्राला नाबार्डने दिलेल्या सहकार्याची दखल घेतली. त्यांनी नवीन जागा मिळविण्यासाठी सहकार मंत्री श्री सुभाष शिरोडकर यांनी केलेल्या प्रयत्नांचेही कौतुक केले आणि ‘म्हाजे घर’ उपक्रमाच्या प्रगतीनंतर प्रस्तावित ‘म्हाजो फ्लॅट’ उपक्रमाची प्रक्रिया लवकरच सुरू होईल, अशी घोषणा केली.
गोव्यातील सहकार चळवळीच्या सामर्थ्यावर प्रकाश टाकत मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी राज्यभरात ५,६०० हून अधिक सहकारी संस्था सक्रियपणे कार्यरत आहेत असे नमुद केले. या कार्यक्रमात सहकारी संस्था निबंधक कार्यालयाचे कर्मचारी आणि झीरो एनपीए असलेल्या बहुउद्देशीय संस्थांसह विविध सहकारी संस्थांचा या क्षेत्रातील योगदानाबद्दल सत्कार करण्यात आला. ‘सहकार से समृद्धी’ या दूरदृष्टीचे प्रतिबिंब दर्शविणारा हा उद्घाटन सोहळा सहकारी संस्थांना बळकट करण्याच्या आणि सहकारी प्रतिमानाद्वारे सर्वसमावेशक विकासाला चालना देण्याच्या दिशेने टाकलेले आणखी एक पाऊल आहे.
या कार्यक्रमाला सहकार आणि जलस्त्रोतमंत्री श्री सुभाष ए. शिरोडकर, साताक्रुझ मतदारसंघाचे आमदार श्री रुडॉल्फ फर्नांडिस, सचिव (सहकार), आयएफएस, श्री महेश कुमार शंभू, जिल्हा पंचायत सदस्य, श्रीमती गौरी कामत, सहकारी संस्थांचे निबंधक, श्री आशुतोष आपटे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
