जागतिक पर्यावरण दिन २०२६ रोजी ‘हरित गोवा, स्वच्छ गोवा’ चळवळीचा शुभारंभ हवामान बदलाच्या कृतीला गती
९० दिवसांच्या हरित अभियानांतर्गत गोव्यात सुमारे १० लाख झाडे लावण्याचे लक्ष्य.
५ जून, २०२६
शाश्वतता, पर्यावरणीय संवर्धन आणि जनसहभाग यावर प्रबळ भर देत, गोवा सरकारने पणजी येथे आयोजित जागतिक पर्यावरण दिन २०२६ या कार्यक्रमात राज्यव्यापी ‘हरित गोवा, स्वच्छ गोवा’ चळवळ सुरू केली. या वर्षीच्या “निसर्गाकडून प्रेरित. हवामानासाठी, आपल्या भविष्यासाठी,” या जागतिक संकल्पनेने प्रेरित होऊन, हा उपक्रम राज्यभरात पर्यावरणीय जागृतीला प्रोत्साहन देणे आणि हवामान कृती प्रयत्नांना बळकट करणे हे उद्दिष्ट ठेवतो.
या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून, सरकारने ९० दिवसांच्या हरित अभियानाची घोषणा केली आहे, त्यानुसार ५ जून ते ५ सप्टेंबर पर्यंत संपूर्ण गोव्यात सुमारे १० लाख झाडे लावली जातील. राज्यभरात हळूहळू ग्रीन कॉरिडॉर विकसित करण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून, पत्रादेवी ते पोळे पर्यंतच्या राष्ट्रीय महामार्ग ६६ वरही वृक्षारोपण मोहीम राबविली जाईल. या कार्यक्रमादरम्यान मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचा २०२५-२०२६ चा वार्षिक अहवाल प्रकाशित केला, ‘गोव्याचे कृषिनायक’ या पुस्तकाचे प्रकाशन केले आणि कचरा व्यवस्थापनातील क्षमता वाढविण्याच्या उद्देशाने दुहेरी प्रशिक्षण प्रणालीअंतर्गत ‘कचरा व्यवस्थापन तंत्रज्ञ’ अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ, गोवा कचरा व्यवस्थापन महामंडळ आणि काकोडा सरकारी औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांच्यात झालेल्या सामंजस्य कराराची देवाणघेवाण केली.
उपस्थितांसमोर बोलताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी “जेव्हा लोक १० लाख झाडे लावण्याबद्दल ऐकतात, तेव्हा त्यांना वृक्षारोपण मोहीम आठवते. गोव्याचे भविष्य आपण आज घेत असलेल्या निर्णयांवर अवलंबून आहे असे सांगितले. मी प्रत्येक नागरिकाला आवाहन करतो की, एक झाड लावा, त्याचे संगोपन करा आणि त्याचे संरक्षण करा, कारण पर्यावरणाची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे असे ते म्हणाले. प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी यांच्या ‘एक पेड माँ के नाम’ या उपक्रमापासून प्रेरणा घेऊन, मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी अधिक जनसहभागाचे आवाहन केले आणि उद्योग व कंपन्यांना सीएसआर उपक्रमांद्वारे या मोहिमेत योगदान देण्यास प्रोत्साहित केले. गोव्याच्या पर्यावरणीय सामर्थ्यावर प्रकाश टाकत त्यांनी राज्यात जवळपास ६८ टक्के हरित आच्छादन असून २५ पाणथळ जागा आणि १६८ जलस्रोत आहेत असे सांगितले, तर सरकार वनीकरण, खाजन जमिनीचे पुनरुज्जीवन, शाश्वत वाहतूक आणि वैज्ञानिक कचरा व्यवस्थापन उपक्रमांवर लक्ष केंद्रित करीत आहे.
पुढे बोलताना डॉ. सावंत यांनी गोव्याचे शाश्वत भविष्य सुनिश्चित करण्यासाठी पर्यावरण संरक्षण आणि विकास एकत्रच पुढे जायला हवे. त्यांनी जैवविविधता संवर्धन, कचरा व्यवस्थापन आणि पर्यावरणीय पुनर्संचयनासाठी सातत्याने काम केल्याबद्दल पर्यावरण आणि हवामान बदल खाते, गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि संबंधित संस्थांची प्रशंसा केली.
डॉ. सावंत यांनी नवीनीकरण ऊर्जा आणि शाश्वत वाहतूक उपक्रमांमधील गोव्याच्या प्रगतीवरही प्रकाश टाकला आणि हे राज्य पर्यावरणीय प्रशासन आणि हवामान जबाबदारीसाठी एक मजबूत आदर्श म्हणून उदयास येत आहे असे सांगितले .
या कार्यक्रमात पोस्टर स्पर्धा, पर्यावरण प्रश्नमंजुषा स्पर्धा, इको शेफ चॅम्पियनशिप, छायाचित्रण स्पर्धा विजेत्यांना बक्षीस वितरण समारंभ तसेच उद्योग आणि खात्यांद्वारे राबविण्यात येणाऱ्या सर्वोत्तम पर्यावरणीय पद्धतींना मान्यता देणारे पुरस्कारही प्रदान करण्यात आले. या कार्यक्रमादरम्यान गोवा राज्य जैवविविधता मंडळाचे पुरस्कारही प्रदान करण्यात आले. शाश्वत शेतीमधील योगदानाबद्दल प्रगतिशील शेतकरी श्री अक्षय पुरके आणि श्रीमती अमिता नाईक यांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाला राज्यसभेचे श्री सदानंद शेट तानावडे, महसूल मंत्री श्री आतानासियो मोन्सेरात, मुख्य सचिव डॉ. व्ही. कांदावेलू, आयएएस, कुंभारजुवाचे आमदार श्री राजेश फळदेसाई, पणजीचे महापौर श्री रोहित मोन्सेरात, सांताक्रुझचे आमदार श्री रुडॉल्फ फर्नांडिस, पर्यावरण खात्याचे संचालक श्री सचिन एस. देसाई, श्री सरप्रीत सिंग गिल, आयएएस, गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष डॉ. लेविन्सन जे. मार्टिन्स, आयएएस, श्री हरीश अडकोणकर, गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सदस्य सचिव डॉ. गीता नागवेंकर, गोवा राज्य जैवविविधता मंडळाचे सदस्य सचिव डॉ. प्रदीप सरमोकादम आणि प्रधान मुख्य अभियंता श्री संदीप चोडणेकर, वरिष्ठ सरकारी अधिकारी, पर्यावरणवादी, विद्यार्थी, शेतकरी आणि नागरिक उपस्थित होते.
मा/वाप/अहे/एपी/रना/२०२६/३७७
