Latest NewsMarathi Press ReleasePress Releases

गोव्यात कामाच्या ठिकाणी सुरक्षा आणि औद्योगिक प्रशासन मजबूत करण्यासाठी अपरांत सुरक्षा भवनचे उद्घाटन पायाभूत सुविधां, सुरक्षित कार्यस्थळे, कुशल मनुष्यबळ आणि अधिक मजबूत संस्था उभारण्याची आमची वचनबद्धता -मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

२४ जुलै, २०२६

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सुरक्षित कार्यस्थळे आणि आधुनिक सार्वजनिक पायाभूत सुविधांप्रति गोवा सरकारची वचनबद्धता प्रतिपादून आल्तिन येथे कारखाना व बॉयलर निरीक्षक कार्यालयाच्या ‘अपरांत सुरक्षा भवन’ या नवीन कार्यालयाचे उद्घाटन केले. गोवा राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाने १३.५३ कोटी रुपये खर्च करून विकसित केलेली ही सुविधा, व्यावसायिक सुरक्षा मजबूत करील तसेच नियामक सेवांमध्ये सुधारणा करील आणि सार्वजनिक सेवा वितरण वाढवेल असे ते म्हणाले.

हे उद्घाटन आधुनिक आणि नागरिक-केंद्रित संस्था उभारण्याच्या सरकारच्या प्रयत्नांमधील एक महत्त्वाचा टप्पा आहे. अपरांत सुरक्षा भवन तपासणी विभागाच्या सर्व प्रमुख विभागांना एका छताखाली आणते, ज्यामुळे उत्तम समन्वय आणि जलद सेवा शक्य होतात. या सुविधेत प्रगत सुरक्षा चाचणी प्रयोगशाळा, समर्पित प्रशिक्षण आणि परिषद सुविधा, तसेच आधुनिक प्रशासकीय पायाभूत सुविधा आहेत. यामुळे औद्योगिक अनुपालन मजबूत होईल, कामाच्या ठिकाणी सुरक्षिततेला प्रोत्साहन मिळेल, व्यवसाय सुलभतेला सहकार्य मिळेल आणि स्वयंपूर्ण गोव्याच्या संकल्पनेला हातभार लागेल.

नवीन सुविधेचे महत्त्व प्रतिपादताना, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी अपरांत सुरक्षा भवन हे आधुनिक शासन, सुरक्षित कामाची ठिकाणे आणि अधिक मजबूत संस्थांप्रति असलेल्या आमच्या वचनबद्धतेचे प्रतीक आहे असे सांगितले. आमची वचनबद्धता केवळ पायाभूत सुविधांपुरती मर्यादित नसून, ती सुरक्षित कार्य ठिकाणे, कुशल मनुष्यबळ आणि अधिक मजबूत संस्था उभारण्यापर्यंत विस्तारलेली आहे. कामगारांची सुरक्षा हे केवळ एक कायदेशीर बंधन नसून, शाश्वत औद्योगिक विकासाचा पाया आहे असे ते म्हणाले. व्यावसायिक सुरक्षेमधील गुंतवणूक ही गोव्याच्या मनुष्यबळात आणि भविष्यात केलेली गुंतवणूक आहे. त्यांनी कारखाना व बॉयलर निरीक्षक खात्याने गेल्या पाच वर्षांत १६,००० हून अधिक कामगार, विद्यार्थी आणि उद्योग व्यावसायिकांना प्रशिक्षण देऊन राज्यभरात व्यावसायिक सुरक्षेविषयीची जागरूकता वाढविली आहे असेही ते म्हणाले.

या इमारतीमध्ये तळघर, तळमजला आणि पहिला मजला असून एकूण बांधकाम क्षेत्रफळ २,३६९.३९ चौरस मीटर आहे. यामध्ये प्रशासकीय कार्यालये, तपासणी आणि तांत्रिक विभाग, प्रगत सुरक्षा चाचणी प्रयोगशाळा, एक व्यावसायिक आरोग्य प्रयोगशाळा, ग्रंथालय, छोटा परिषद कक्ष आणि विशेष प्रशिक्षण कक्ष आहे. या सुविधेत अडथळामुक्त सुविधा, प्रतीक्षा कक्ष, सुशोभित जागा आणि पार्किंग सुविधांचाही समावेश आहे, ज्यामुळे अधिकारी, उद्योग क्षेत्रातील हितधारक आणि नागरिकांसाठी एक आधुनिक आणि सुलभ वातावरण उपलब्ध होते.

उद्घाटन समारंभास मत्स्योध्योग आणि कारखाने व बॉयलर मंत्री श्री नीलकंठ हळर्णकर, जीसीएस, व्यवस्थापकीय संचालक श्री रोहित कदम, कारखाने व बॉयलर खात्याचे सचिव श्री संजीव एम. गडकर, , कारखाने व बॉयलरचे मुख्य निरीक्षक, श्री अनंत एस. पांगम, गोवा चेंबर ऑफ कॉमर्स आणि इंडस्ट्रीचे अध्यक्ष श्रीमती प्रतिमा धोंड, विविध उद्योगांचे प्रतिनिधी, वरिष्ठ सरकारी अधिकारी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

मा/वाप/अहे/एपी/रना/२०२६/४५४

Skip to content