Latest NewsMarathi Press ReleasePress Releases

आयुर्वेद — स्वस्थ भविष्यासाठी

२२ सप्टेंबर, २०२६

पूर्वी आयुर्वेद दिन धनत्रयोदशी अर्थात भगवान धन्वंतरी जयंतीच्या दिवशी साजरा केला जात असे.

भगवान धन्वंतरी यांना आयुर्वेदाचे अधिष्ठाता मानले जाते आणि त्यामुळे धनत्रयोदशीचा दिवस आयुर्वेदाच्या दृष्टीने विशेष महत्त्वाचा आहे.

मात्र धनत्रयोदशी ही चांद्र पंचांगानुसार येणारी तिथी असल्याने तिची ग्रेगोरियन दिनदर्शिकेतील तारीख

दरवर्षी बदलते. त्यामुळे आयुर्वेद दिनाचे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर एकसंध नियोजन, जनजागृती कार्यक्रम, शैक्षणिक उपक्रम, परिषद व विविध आरोग्यविषयक कार्यक्रम आयोजित करण्यासाठी एक निश्चित तारीख असणे आवश्यक होते.

या पार्श्वभूमीवर भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाने २३ सप्टेंबर हा दरवर्षीचा निश्चित आयुर्वेद दिन

म्हणून घोषित केला. २३ सप्टेंबरच्या आसपास शरद्‌ विषुव (Autumnal Equinox) येतो, ज्यामध्ये दिवस आणि रात्र जवळपास समान असतात. हे संतुलन आणि समत्वाचे प्रतीक असून, आयुर्वेदाच्या शरीर, मन आणि निसर्गातील संतुलनाच्या मूलभूत संकल्पनेशी त्याचा सुंदर संबंध आहे.

त्यामुळे धनत्रयोदशीचे पारंपरिक व धार्मिक महत्त्व कायम ठेवून, २३ सप्टेंबर हा आयुर्वेदाच्या राष्ट्रीय व जागतिक स्तरावरील प्रसारासाठी निश्चित वार्षिक दिन म्हणून स्वीकारण्यात आला आहे.

“आयुर्वेद दिन — परंपरेचा सन्मान, संतुलित जीवनाचा संदेश आणि आरोग्यदायी भविष्यासाठी संकल्प.” “आरोग्य हीच खरी संपत्ती” ही केवळ म्हण नसून निरोगी आणि आनंदी जीवनाची मूलभूत संकल्पना आहे. आधुनिक युगात विज्ञान आणि तंत्रज्ञानामुळे जीवन अधिक सुलभ झाले असले, तरी बदलती जीवनशैली,

अनियमित आहार, अपुरी झोप, वाढता मानसिक ताण, व्यायामाचा अभाव आणि विविध व्यसनांमुळे जीवनशैलीशी संबंधित आजारांचे प्रमाण वाढत आहे. मधुमेह, उच्च रक्तदाब, लठ्ठपणा, हृदयविकार आणि मानसिक तणाव यांसारख्या समस्या आज सर्व वयोगटांत दिसून येतात. अशा परिस्थितीत भारताची प्राचीन आरोग्य परंपरा असलेला आयुर्वेद आपल्याला निरोगी जीवन जगण्याचा समतोल आणि निसर्गाशी सुसंगत मार्ग दाखवितो.

आयुर्वेदाचा मुख्य उद्देश केवळ रोग झाल्यानंतर उपचार करणे हा नसून निरोगी व्यक्तीच्या आरोग्याचे संरक्षण करणे आणि आजारी व्यक्तीच्या विकारांचे शमन करणे हा आहे. “स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम्, आतुरस्य विकार प्रशमनम्” हे आयुर्वेदाचे मूलभूत तत्त्व आहे. त्यामुळे निरोगी उद्यासाठी आयुर्वेदातील

जीवनशैलीविषयक तत्त्वांचा योग्य प्रकारे अवलंब करणे महत्त्वाचे आहे.

दिनचर्या — निरोगी दिवसाची सुरुवात

नियमित आणि शिस्तबद्ध दैनंदिन जीवनाला आयुर्वेदात दिनचर्या म्हटले जाते. सकाळी योग्य वेळी उठणे, शरीराची स्वच्छता राखणे, दात आणि जिभेची स्वच्छता करणे, आवश्यकतेनुसार अभ्यंग करणे, नियमित व्यायाम करणे, स्नान करणे आणि योग्य वेळी आहार घेणे हे दिनचर्येचे महत्त्वाचे भाग आहेत.

आजच्या धकाधकीच्या जीवनात अनेक जण नाश्ता टाळतात, उशिरापर्यंत जागतात आणि अनियमित वेळी

जेवतात. अशा सवयी शरीराच्या नैसर्गिक लयीत अडथळा आणू शकतात. त्यामुळे नियमित वेळापत्रक,

संतुलित आहार, शारीरिक हालचाल आणि पुरेशी झोप यांना दैनंदिन जीवनात स्थान देणे आवश्यक आहे.

ऋतुचर्या — ऋतूनुसार जीवनशैली

निसर्गामध्ये सतत बदल होत असतात. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा आणि इतर ऋतूंमध्ये वातावरणातील तापमान, आर्द्रता आणि आहाराच्या उपलब्धतेत बदल होतात. या बदलांनुसार आहार-विहारात योग्य ते परिवर्तन करणे म्हणजे ऋतुचर्या. उन्हाळ्यात शरीराला पाण्याची अधिक आवश्यकता असते, त्यामुळे पुरेसे द्रवपदार्थ घेणे आणि हलका आहार घेणे उपयुक्त ठरते. पावसाळ्यात पचनशक्ती कमी होण्याची शक्यता असल्याने ताजे, स्वच्छ आणि सहज पचणारे अन्न घेण्यावर भर द्यावा. हिवाळ्यात पौष्टिक आणि संतुलित आहाराबरोबर नियमित शारीरिक हालचाल करणे महत्त्वाचे आहे. ऋतूनुसार स्थानिक आणि ताज्या अन्नपदार्थांना प्राधान्य देणे ही आरोग्यदायी सवय आहे.

योग — शरीर आणि मनाचा समतोल

योग ही भारताची अमूल्य देणगी आहे. योगासनांचा नियमित सराव शरीराची लवचिकता, स्नायूंची ताकद आणि शारीरिक तंदुरुस्ती सुधारण्यास मदत करू शकतो. त्याचबरोबर योग मनाला स्थिर करण्यास आणि तणावाचे व्यवस्थापन करण्यास उपयुक्त ठरतो. आज अनेक लोक दीर्घकाळ बसून काम करतात.त्यामुळे पाठदुखी, मानदुखी, स्थूलता आणि शारीरिक निष्क्रियता यांसारख्या समस्या निर्माण होऊ शकतात. योग्य मार्गदर्शनाखाली नियमित योगासनांचा सराव आणि दैनंदिन जीवनात शारीरिक हालचाली वाढविणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते.

प्राणायाम — श्वासातून मनःशांती

श्वास हा शरीर आणि मन यांना जोडणारा महत्त्वाचा दुवा आहे. प्राणायाम म्हणजे श्वासोच्छ्वासाचे

नियमन आणि श्वासाशी संबंधित साधना. अनुलोम-विलोम, भ्रामरी यांसारख्या प्राणायामांचा योग्य पद्धतीने सराव मन शांत करण्यास आणि विश्रांती मिळवण्यास मदत करू शकतो. प्राणायाम करताना योग्य तंत्र समजून घेणे आवश्यक आहे. विशेषतः काही आरोग्यविषयक समस्या असलेल्या व्यक्तींनी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली सराव करणे अधिक योग्य ठरते. योग आणि प्राणायामासोबत ध्यानाचा समावेश केल्यास मानसिक स्वास्थ्यासाठीही सकारात्मक वातावरण निर्माण होऊ शकते.

त्रयोपस्तंभ — आरोग्याचे तीन आधारस्तंभ

आयुर्वेदात आहार, निद्रा आणि ब्रह्मचर्य यांना त्रयोपस्तंभ म्हणजेच जीवनाचे तीन आधारस्तंभ मानले

आहेत. आहार हा शरीराला ऊर्जा आणि पोषण देतो. संतुलित, ताजा, स्वच्छ आणि योग्य प्रमाणातील आहार घेणे आवश्यक आहे. अति प्रक्रिया केलेले पदार्थ, अतिरिक्त साखर, मीठ आणि तेल यांचे सेवन मर्यादित ठेवणे

हितावह आहे. निद्रा शरीर आणि मनाला विश्रांती देते. नियमित वेळेवर झोपणे आणि पुरेशी झोप घेणे शारीरिक तसेच मानसिक आरोग्यासाठी आवश्यक आहे. झोपण्यापूर्वी मोबाईल आणि इतर स्क्रीनचा वापर कमी करणेही उपयुक्त ठरू शकते. तिसरा आधारस्तंभ ब्रह्मचर्य हा केवळ एका अर्थाने न पाहता संयमित, संतुलित आणि जबाबदार जीवनशैली म्हणून समजणे महत्त्वाचे आहे. इंद्रियांचे योग्य नियंत्रण, शिस्त आणि सदाचार यांचा त्यात समावेश होतो.

जीवनशैली — बदलाची सुरुवात स्वतःपासून

निरोगी उद्यासाठी आपल्या जीवनशैलीत काही साधे पण महत्त्वाचे बदल करणे आवश्यक आहे. संतुलित आहार घेणे, दररोज शारीरिक हालचाल करणे, योग व प्राणायामाचा सराव करणे, पुरेशी झोप घेणे, तंबाखू आणि इतर व्यसनांपासून दूर राहणे, ताणतणावाचे योग्य व्यवस्थापन करणे आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवणे हे आरोग्यदायी जीवनाचे महत्त्वाचे घटक आहेत. तसेच नियमित आरोग्य तपासणी, योग्य वेळी वैद्यकीय सल्ला घेणे आणि स्वतःहून औषधे न घेणे हेही तितकेच महत्त्वाचे आहे. आयुर्वेदातील औषधे किंवा उपचारपद्धतीही पात्र आयुर्वेद चिकित्सकांच्या सल्ल्यानेच वापरणे योग्य आहे.

निष्कर्ष

आयुर्वेद ही केवळ उपचारपद्धती नसून निसर्गाशी सुसंगत आणि संतुलित जीवन जगण्याची जीवनदृष्टी आहे. दिनचर्या आणि ऋतुचर्या अंगीकारणे, योग व प्राणायामाचा नियमित सराव करणे, त्रयोपस्तंभांचे महत्त्व समजून घेणे आणि आरोग्यदायी जीवनशैली स्वीकारणे यामुळे आपल्या आरोग्याबद्दलची जाणीव अधिक दृढ होऊ शकते.

आज आपण आरोग्यासाठी घेतलेली प्रत्येक छोटी सकारात्मक पायरी ही उद्याच्या निरोगी समाजासाठी मोठी गुंतवणूक आहे. त्यामुळे “आजची आरोग्यदायी सवय म्हणजे उद्याच्या निरोगी जीवनाची शिदोरी” हे लक्षात ठेवून आयुर्वेदाच्या मूलभूत तत्त्वांचा आधुनिक जीवनाशी योग्य समन्वय साधुया. “निरोगी शरीर, प्रसन्न मन, संतुलित जीवन आणि निसर्गाशी सुसंवाद — हाच आयुर्वेदाचा निरोगी उद्यासाठी संदेश!”

डॉ. संतोष गणपती वेर्णेकर

आयुर्वेद चिकित्सक – प्राथमिक आरोग्य केंद्र बाळ्ळी

आयुष विभाग – गोवा सरकार

मा/वाप/अहे/एपी/रना/२०२६/६३९

Skip to content