Latest NewsMarathi Press ReleasePress Releases

केंद्रिय नवीन आणि नवीनीकरण उर्जा मंत्र्यांहस्ते जागतिक पवन दिवस परिषदेचे उद्घाटन

१५ जून २०२६

केंद्रीय नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री श्री प्रल्हाद जोशी यांच्याहस्ते आयटीसी ग्रॅंड गोवा येथे जागतिक पवन दिवस परिषदेचे उद्घाटन झाले. “पवन ऊर्जा: महत्त्वाकांक्षा ते गतीपर्यंत” अशी परिषदेची संकल्पना होती.

केंद्रीय नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाने परिषदेचे आयोजन केले होते. केंद्रीय नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा राज्यमंत्री श्री श्रीपाद नाईक आणि नवीन आणि नवीनीकरण उर्जामंत्री श्री रामकृष्ण ढवळीकर यांच्या उपस्थितीत परिषदेचे उद्घाटन झाले.

उपस्थितांना संबोधित करताना, केंद्रीय नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री श्री प्रल्हाद जोशी यांनी गेल्या दशकात भारताच्या नवीकरणीय ऊर्जा क्षेत्राने उल्लेखनीय वाढ अनुभवली असून, पवन आणि सौर ऊर्जा शाश्वत विकासाचे प्रमुख चालक म्हणून उदयास आल्या आहेत असे सांगितले. त्यांनी प्रभावी धोरणे, दर्जेदार पायाभूत सुविधा आणि मजबूत अंमलबजावणी भारताला नवीकरणीय ऊर्जेमध्ये जागतिक नेता म्हणून उदयास येण्यास मदत करू शकेल असेही सांगितले.

नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा राज्यमंत्री श्री श्रीपाद नाईक यानी भारताने स्वच्छ ऊर्जेची महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट्ये निश्चित केली आहेत आणि पारेषणातील आव्हानांना तोंड देताना पवन ऊर्जेचा वापर वाढविण्याच्या प्रयत्नांना गती दिली पाहिजे असे सांगितले.

नवीन आणि नवीनीकरण उर्जामंत्री श्री रामकृष्ण (सुदिन) ढवळीकर यांनी पवन ऊर्जा हा ऊर्जेचा एक स्वच्छ, परवडणारा आणि पर्यावरणास अनुकूल स्रोत आहे, जो अधिक हरित आणि शाश्वत भविष्यासाठी आवश्यक आहे असे सांगितले.

उपस्थित असलेल्यांमध्ये नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाचे सचिव श्री संतोष कुमार सारंगी (आयएएस), सोलर एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक श्री आकाश त्रिपाठी, जीयूव्हीएनएलच्या व्यवस्थापकीय संचालक श्रीमती शालिनी अग्रवाल, सेंट्रल ट्रान्समिशन युटिलिटी ऑफ इंडिया लिमिटेडचे सीओओ श्री कैलाश कुमार गुप्ता, एआयडीएचे महासंचालक आणि माजी ऊर्जा सचिव श्री आलोक कुमार, सीईएचे मुख्य अभियंता श्री इशान शरण, आयडब्ल्यूटीएमएचे अध्यक्ष श्री गिरीश तांती, डब्ल्यूआयपीपीएचे उपाध्यक्ष श्री महेश विप्रदास, आयडब्ल्यूपीएचे अध्यक्ष श्री टी. शिवरामन यांच्यासह केंद्र आणि राज्य सरकारचे वरिष्ठ अधिकारी आणि नवीकरणीय ऊर्जा क्षेत्राचे प्रतिनिधी यांचा समावेश होता.

मा/वाप/अहे/एपी/रना/२०२६/३८३

Skip to content