१ मार्च रोजी राष्ट्रीय साधन-तथा गुणवत्ता शिष्यवृत्ती योजना परीक्षा
९ फेब्रुवारी २०२६
भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या शालेय शिक्षण आणि साक्षरता खात्याकडून “राष्ट्रीय साधन-तथा गुणवत्ता शिष्यवृत्ती योजना ही केंद्रीय क्षेत्रातील योजना राबविण्यात येत आहे. ही योजना आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील गुणवंत विद्यार्थ्यांना आठवी इयत्तेतील शिक्षण सोडण्यापासून रोखण्यासाठी आणि माध्यमिक स्तरावर शिक्षण सुरू ठेवण्यासाठी शिष्यवृत्ती प्रदान करण्यासाठी राबविली जात आहे. या योजनेअंतर्गत, नववीच्या प्रत्येक पात्र विद्यार्थ्याला दरवर्षी १२,०००/- रुपये शिष्यवृत्ती दिली जाते जी निर्धारित अटींच्या पूर्ततेनुसार बारावीपर्यंत चालू राहू शकते. गोवा राज्यासाठी उपलब्ध असलेल्या शिष्यवृत्तींची एकूण संख्या १४४ आहे.
ही परीक्षा फक्त २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात आठवी इयत्तेत शिकणाऱ्या सरकारी, सरकारी अनुदानित आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी आहे. परंतु ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांचे सर्व स्रोतांमधून एकूण वार्षिक उत्पन्न ३.५ लाख रुपयांपेक्षा जास्त नाही आणि ज्यांनी इयत्ता सातवीच्या परीक्षेत किमान ५५ टक्के गुण किंवा समकक्ष ग्रेड मिळवला आहे (अनुसूचित जाती/जमातीसाठी ५ टक्के सवलत) तेच १ मार्च २०२६ रोजी गोवा राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण मंडळ आल्त पर्वरीद्वारे आयोजित करण्यात येणाऱ्या राष्ट्रीय साधन-तथा गुणवत्ता शिष्यवृत्ती योजना परीक्षा २०२५-२६ मध्ये बसण्यास पात्र आहेत. शाळा प्रमुखांनी २०२५-२६ च्या एनएमएमएसएस परीक्षेसाठी विद्यार्थ्यांचे नामांकन सादर करण्याची शेवटची तारीख १४ फेब्रुवारी २०२६ अशी आहे.
मा/वाप/दिबां/ एपी /रना/ २०२६/११२

