Latest NewsMarathi Press ReleasePress Releases

कोकणी राजभाषा दिवस साजरा

४ फेब्रुवारी २०२६

आज गोवा राज्य मध्यवर्ती ग्रंथालय, संस्कृती भवन, पणजी येथे ३९ वा कोकणी राजभाषा दिवस साजरा करण्यात आला. ४ फेब्रुवारी १९८७ रोजी गोवा, दमण आणि दीव राजभाषा कायदा, १९८७ संमत झाला, ज्यामुळे कोकणी ही गोव्याची एकमेव राजभाषा बनली. या स्मरणोत्सवात संसाधन व्यक्ती असलेले गोवा विद्यापीठातील कोकणीचे सहयोगी प्राध्यापक डॉ. हनुमंत चोपडेकर यांनी कोकणीला गोव्याची अधिकृत भाषा म्हणून मान्यता मिळवून देण्यासाठी केलेला संघर्ष आणि त्यागाचे स्मरण केले. असे म्हटले जाते की ज्यांना त्यांचा भूतकाळ माहित नाही त्यांचे भविष्य नसते. आपली मुळे जाणून घेणे महत्वाचे आहे आणि त्यात भाषा मोठी भूमिका बजावते असे ते म्हणाले. कोकणीच्या राजभाषा दिनाचा हा उत्सव सर्वसामान्यांचा असावा आणि सर्वांनी त्याचे महत्त्व ओळखले पाहिजे.

सुप्रसिद्ध शब्धकोशकार आणि व्याकरणकार श्री दामोदर घाणेकर यांनीही कोकणीला गोव्याची राजभाषा बनविण्यासाठी केलेल्या धाडसी संघर्षाच्या ठळक घटनांचे स्मरण केले. कोकणीत काय कमी आहे हे आपण विचारू नये, कारण गेल्या काही दशकांपासून लोकांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे ही भाषा विकसित झाली आहे आणि ती अजूनही सुरू आहे. कोकणी ही ‘लोकभाषा’ (गोव्यातील लोकांची भाषा) आहे असे ते म्हणाले.

साहित्य अकादमी पुरस्कार विजेते, कवी आणि लेखक शंकर रमाणी यांच्यावरील ‘झाद निराकार’ हा माहितीपट आणि स्वातंत्र्यसैनिक, लेखक, पत्रकार, समाजसुधारक लक्ष्मीदास बोरकर यांच्यावरील ‘दासपर्व’ हा माहितीपट नंतर दाखविण्यात आला.

कोकणी लेखक, कवी, विद्यार्थी, शिक्षक आणि इतर यावेळी उपस्थित होते. गोवा राज्य मध्यवर्ती ग्रंथालयाच्या क्युरेटर श्रीमती सुलक्षा कोलमुळे यांनी आभार मानले.

मा/वाप/दिबां/ एपी /रना/ २०२६/१०३

Skip to content