२ ऑक्टोबर २०२५
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी राज्याच्या सामाजिक आर्थिक प्रगतीत कदंब बसेसची मोठी भूमिका असल्याचे सांगितले. मुख्यमंत्री आज पणजी येथील केटीसी बस स्टँड कॉम्प्लेक्समध्ये आयोजित कदंब वाहतूक महामंडळाच्या ४५ व्या वर्धापन दिन समारंभात बोलत होते. यावेळी बोलताना डॉ. सावंत यांनी कदंब बसेस गोव्याची जीवनरेखा असल्याचे म्हटले, ज्या नफा मिळवण्यापेक्षा सेवेवर लक्ष केंद्रित करतात. “कदंब बसेस नेहमीच प्रवासी केंद्रित राहिल्या आहेत,” असे डॉ. सावंत म्हणाले.
मुख्यमंत्री म्हणाले की, कादंबच्या सेवांमुळे संपूर्ण राज्यात लोकांना मदत झाली आहे आणि कदंबच्या कर्मचाऱ्यांचे त्यांच्या समर्पित सेवेबद्दल कौतुक केले. डॉ. सावंत यांनी कदंब महामंडळामध्ये डिजिटायझेशनचे काम जोरात सुरू असल्याची माहिती दिली आणि लोकांना मासिक पास आणि स्मार्ट ट्रान्झिट कार्डचा लाभ घेण्याचे आवाहन केले. मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, स्वच्छ आणि हरित गोवा सुनिश्चित करण्यासाठी कदंब महामंडळ इलेक्ट्रिक बसेसचा ताफा वाढवेल. डॉ. सावंत यांनी खाजगी बस ऑपरेटर्सना सरकारच्या ‘म्हजी बस’ योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन केले, जिथे गोव्यात सार्वजनिक वाहतूक आधुनिकीकरण करण्यासाठी बस मालकांना विविध प्रोत्साहने दिली जातात.
डॉ. सावंत यांनी कदंब महामंडळाला बळकटी देण्यासाठी पावले उचलण्याचे आश्वासन दिले आणि सांगितले की केटीसीएलच्या निवृत्त आणि सध्याच्या कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न विचारात घेतला जात आहे. केटीसीएल कर्मचाऱ्यांच्या कल्याणास नेहमीच प्राधान्य असते आणि रिफ्रेशर कोर्सेस, ताण व्यवस्थापन उपाय इत्यादी सुविधा पुरवल्या जातील.
या प्रसंगी बोलताना वाहतूक मंत्री श्री माविन गुदिन्हो यांनी खाजगी वाहतुकीपेक्षा कदंब बस सेवांना अधिकाधिक लोक पसंत करत आहेत हे पाहून आनंद व्यक्त केला. गोव्यात सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे आधुनिकीकरण करण्याचा एक भाग म्हणून, कदंब महामंडळ डिजिटलायझेशनचा गांभीर्याने स्वीकार करत आहे आणि लवकरच ते साध्य करण्यासाठी बसेसचे इलेक्ट्रॉनिक ट्रॅकिंग, मार्गांचे जिओ मॅपिंग इत्यादी सुविधा सुरू करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
नाविलीचे आमदार आणि कदंबचे अध्यक्ष श्री उल्हास तुयेकर यांनी कदंब कर्मचाऱ्यांचे चांगले काम केल्याबद्दल कौतुक केले. त्यांनी २०२७ पर्यंत २८० जुन्या कदंब बस रद्द करून विविध मार्गांवर सुमारे १०० इलेक्ट्रिक बस सुरू करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती दिली. केटीसीएलच्या गरजांना नेहमीच प्रतिसाद दिल्याबद्दल त्यांनी सरकारचे आभार मानले.
सुरवातीस मान्यवरांच्या उपस्थितीत पहिल्या केटीसी बसची पूजा करण्यात आली. याप्रसंगी केटीसीएलच्या कर्मचाऱ्यांच्या गुणवंत मुलांचा सत्कार करण्यात आला.
मा/वाप/दिबा/एपी/र ना २०२५