२ ऑक्टोबर २०२५
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज राज्यातील जनतेच्यावतीने जुने गोवा येथील महात्मा गांधींच्या पुतळ्याला पुष्पांजली अर्पण केली.
केंद्रीय ऊर्जा, नवीन आणि नवीनीकरण आणि ऊर्जा राज्यमंत्री श्री श्रीपाद नाईक, आमदार श्री राजेश फळदेसाई, से ओल्ड गोवा पंचायतीचे उपसरपंच श्री अंबर आमोणकर, उत्तर गोवा जिल्हा पंचायतचे अध्यक्ष श्री धाकू मडकईकर, जिल्हा पंचायत सदस्य श्री सिद्धेश एस. नाईक आणि इतरांनी या प्रसंगी महान नेते महात्मा गांधी यांच्या स्मृतीला पुष्पांजली वाहिली.
स्वयंपूर्ण गोवा अभियानाला आज ५ वर्षे पूर्ण होत आहेत, असे प्रतिपादन करताना मुख्यमंत्री म्हणाले की गोवा, गाव आणि शहर स्वावलंबी बनविण्यासाठी प्रयत्नांना पूरक ठरले आहे. या अभियानामुळे समाजातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचणे शक्य झाले आहे आणि सरकारच्या सर्व योजनांपासून कोणीही वंचित राहू नये म्हणून प्रयत्न करण्यात येत आहेत यामध्ये हर घर जल, हर घर बिजली हर घर शौचालय इत्यादींचा समावेश आहे. या अभियानांतर्गत, तरुणांना अधिक सक्षम आणि स्वावलंबी बनवण्यासाठी कृषी, फलोत्पादन, पुष्पोपादन, दुग्धव्यवसाय इत्यादी क्षेत्रांना योग्य महत्त्व दिले जाते.
गोवा स्वच्छ आणि हरीत ठेवण्यासाठी सरकार नियमितपणे धोरणात्मक निर्णय घेते आणि कचरा प्रक्रिया प्रकल्पांसारख्या पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक करते, अशी माहिती त्यांनी दिली. स्वच्छ आणि आकर्षक गोवा निर्माण करण्यासाठी स्वच्छता ही सेवा मोहिमेला मदत करण्याचे आवाहन त्यांनी सर्वांना केले, ज्यामुळे केवळ पर्यटन उद्योगालाच नव्हे तर सर्व गोमंतकीयानाही आरोग्यदायी राहण्यास मदत होईल.
१७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत स्वच्छता, पर्यावरण, सामाजिक कार्य आणि विकसित भारताच्या आदर्शावर लक्ष केंद्रित करणाऱ्या सेवा पंधरवडा मोहिमेदरम्यान त्यांनी सर्व सरकारी खात्यांना दिलेल्या सहकार्याबद्दल त्यांचे कौतुक केले.
मुख्यमंत्र्यांनी म्हाजे घर योजना, दीर्घकालीन रहिवाशांनी बांधलेल्या अनधिकृत घरांना नियमित करण्यासाठी आणि कायदेशीर मान्यता देण्यासाठी एक उपक्रम, ४ ऑक्टोबर २०२५ रोजी होणाऱ्या केंद्रीय गृहमंत्र्यांच्या भेटीदरम्यान सुरू केली जाईल अशी माहिती दिली.
यावेळी श्री सुदेश परांजपे, फादर पॅट्रिसिओ फर्नांडिस आणि हजरत मौलाना महंमद रफिक यांनी भगवद्गीता, बायबल आणि कुराणमधील श्लोकांचे पठण केले.
याप्रसंगी कला अकादमीच्या गायन गटाने भजन सादर केले. से ओल्ड गोव्याचे उपसरपंच श्री अंबर आमोणकर यांनी पाहुण्यांचे स्वागत केले तर श्री प्रदीप नाईक यांनी सूत्रसंचालन केले.
तद्नंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीय वीज, नवीनिकरण आणि ऊर्जा राज्यमंत्री श्री. श्रीपाद नाईक, आमदार श्री. राजेश फळदेसाई, से ओल्ड गोवा पंचायतीचे उपसरपंच श्री. अंबर आमोणकर, जिल्हा पंचायत सदस्य श्री. सिद्धेश एस. नाईक आणि इतर मान्यवरांनी से ओल्ड गोवा ग्रामपंचायतीने भारताचे माजी पंतप्रधान स्व. लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त पंचायत परिसरात आयोजित कार्यक्रमाला उपस्थिती लावली आणि पुष्पांजली अर्पण केली.
मा/वाप/दिबा/ एपी/ र ना/२०२५