मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वेर्णा येथे ट्रॅफिक सिग्नल्सचे उद्घाटन

तारीख : १८ फेब्रुवारी २०२१

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते आज वेर्णा औद्योगिक वसाहतीतील दोन जंक्शनवर ट्रॅफिक सिग्नल्सचे उद्घाटन करण्यात आले. हे सिग्नल्स आयएफबी जंक्शन तसेच कोकाकोला जंक्शनवर उभारण्यात आले आहेत. यावेळी वेर्णा इंडस्ट्रीज असोसिएशनद्वारे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सांवत यांचा सत्कारही करण्यात आला.

यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, वेर्णा औद्योगिक वसाहत ही राज्यातील एक प्रमुख औद्योगिक वसाहत असून ती राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर लोकप्रिय आहे. सरकार औद्योगिक घटकांना नेहमी मदत करीत आले असून त्यांचे प्रश्न सोडविण्यास कटीबद्ध आहे. पुढील आठवड्यात उद्योजक आणि कारखाना आणि बाष्पक खाते, औद्योगिक विकास महामंडळ आणि वीजखाते यांची एक संयुक्त बैठक घेण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

उद्योजक हे रोजगार निर्मिती करणारे घटक असून ते अर्थव्यवस्थेच्या प्रणालीला चालना देतात. कोविडच्या काळात विविध कंपन्यांनी केलेल्या कार्याची त्यांनी प्रशंसा केली. गोवा स्वातंत्र्याची ६० वर्षे साजरी करताना सरकार मानवी विकासावर भर देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

उद्योगांनीच कचर्‍याच्या विल्हेवाटीचा प्रश्न सोडवावा असे सांगून त्यासाठी कचरा विकास महामंडळ मदत करेल असेही ते म्हणाले. सरकारने स्थापन केलेल्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबीलीटी सोसायटीमध्ये आपले योगदान द्यावे असे सांगून या सोसायटी अंतर्गत प्रॉजेक्ट सेल तयार केले असून ते कंपनींच्या सीएसआर प्रकल्पांसाठी सहाय्य करेल असे मुख्यमंत्री म्हणाले.

आत्मनिर्भर भारत स्वयंपूर्ण गोवा या संकल्पनेचा आढावा घेऊन मुख्यमंत्र्यांनी तिच्या अंतर्गत हाती घेतलेल्या कार्यांविषयी माहिती दिली आणि सरकारच्या वोकल फॉर लोकलला आधार द्यावा असेही आवाहन केले.

तिन्ही शिफ्टमधील मजूरांच्या सोईसाठी औद्योगिक वसाहतींमध्ये लवकरच बससेवा चालू करण्यात येणार आहे. साधनसुविधा विकास आणि युवकांचा कौशल्यविकास यांवर सरकारचा भर आहे असे सांगून या वर्षाचा राज्याचा अर्थसंकल्प स्वयंपूर्ण असेल असे मुख्यमंत्री म्हणाले.

यावेळी मुख्यमंत्र्यांनी मे. कलरकॉन एशीया प्रा. लि. यांनी तयार केलेल्या मोटर सायकल पायलट स्टॅन्ड तसेच इतर ठिकाणांना भेट दिली.

वेर्णा इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष श्री. प्रदिप पेरेग्रीनो दा कोश्ता, उपाध्यक्ष श्री राजेश प्रभू आणि इतर यावेळी उपस्थित होते.श्री नितिन कुंकळ्येकर यांनी या संघटनेच्या कार्याची माहिती करून दिली. यावेळी श्री सर्वेश परब आणि श्री रवी रिबलो यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

मा/वाप/सुके/प्रना/पांना/ २०२१/१९०

Skip to content