Latest NewsMarathi Press ReleasePress Releases

सात पंचायतींना आयएसओ प्रमाणपत्र प्राप्त

२३ जानेवारी २०२६

स्थानिक प्रशासनाचे व्यावसायिक, नागरिक केंद्रित आणि पारदर्शक व्यवस्थेत रूपांतर करण्याच्या उद्देशाने गोवा सार्वजनिक प्रशासन आणि ग्रामीण विकास संस्था आणि पंचायत संचालनालयाने आज पर्वरीतील सचिवालयात आयोजित केलेल्या कार्यक्रमात राज्यातील सात ग्रामपंचायतींना आयएसओ प्रमाणपत्रे मिळविली.

पंचायत मंत्री श्री. माविन गुदिन्हो याच्याहस्ते कार्यक्षम सार्वजनिक सेवा पुरवठ्याचे प्रतिबिंबित करणाऱ्या वळवई, सरझोरा, सा मातियास, केरी-तेरेखोल, मेणकुरे-धुमासे, हरवळे आणि चिखली या सात पंचायतींना आयएसओ प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.

पंचायतींच्या कामगिरीबद्दल समाधान व्यक्त करताना मंत्री श्री. गुदिन्हो यांनी आयएसओ प्रमाणपत्रामुळे सात पंचायती प्रशासकीय पद्धतींचा उच्च दर्जा प्राप्त करू शकल्या आहेत आणि ही परंपरा कायम टिकवून ठेवली पाहिजे असे ते म्हणाले.

आणखी ४१ ग्रामपंचायती आयएसओ प्रमाणपत्र मिळविण्याच्या प्रक्रियेत आहेत असेही मंत्र्यांनी सांगितले. पंचायतींना आयएसओ प्रमाणपत्र मिळाल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांची चांगल्या, पारदर्शक आणि चैतन्यशील सार्वजनिक सेवेसाठीची वचनबद्धता निश्चितच वाढली आहे असे ते म्हणाले. तळागाळात सार्वजनिक सेवा पुरवण्यात उच्च दर्जा प्राप्त करून गोवा वेगळा बनवूया असे श्री. गुदिन्हो पुढे म्हणाले.

जीपार्डचे संचालक श्री. वासुदेव शेट्ये यांनी ग्राम पंचायतींमधील सेवा आणि प्रशासकीय व्यवस्थेच्या दर्जांमध्ये सुधारणा करण्यात जीपार्डच्या प्रमुख कामगिरीवर प्रकाश टाकला. तसेच त्यांनी पंचायत संस्थांना आयएसओ प्रमाणपत्र देण्यासाठी राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली.

वळवई पंचायतीचे सरपंच श्री. विनायक वेंगुर्लेकर यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रशासनात आमूलाग्र परिवर्तन घडवून आणणाऱ्या आयएसओ प्रमाणपत्र प्रक्रियेची अंमलबजावणी करण्यासाठी जीआयपीएआरडी आणि पंचायत संचालनालयाच्या प्रयत्नांचे कौतुक केले.

आयएसओ सल्लागार आणि प्रमुख लेखापरीक्षक श्री. एड्रियन सिमोईस यांनी आयएसओ प्रमाणपत्र मिळवणाऱ्या पंचायतींनी नागरिक केंद्रित कामगिरी केली पाहिजे. आयएसओ मिळवणे ही पंचायतींसाठी सुरुवात असली पाहिजे त्यांनी सातत्यपूर्ण प्रयत्नांनी ती टिकवून ठेवली पाहिजे असे ते म्हणाले.

या प्रसंगी निवृत्त वरिष्ठ अधिकारी श्री. एन.डी. अग्रवाल उपस्थित होते. पंचायत संचालक श्री. महादेव आरोंदेकर यांनी आभार मानले.

मा/वाप/दिबां/ एपी /रना/ २०२६/५६

Skip to content