राज्याच्यावतीने गोवा मुक्ती दिनी स्वातंत्र्य सैनिकांना आदरांजली
१९ डिसेंबर २०२५
गोवा मुक्ती दिन सांताक्रूझ येथील गोवा विद्यापीठाच्या मैदानावर आयोजित राज्यस्तरीय समारंभ उत्साहाने आणि आदराने साजरा करण्यात आला. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी राष्ट्रध्वज फडकविला. स्वातंत्र्य सैनिकांच्या अनेक दशकांच्या शौर्यपूर्ण संघर्षानंतर १९ डिसेंबर १९६१ रोजी पोर्तुगीज राजवटीपासून गोवा मुक्त झाला.
गोव्याच्या मुक्तीसाठी आपले प्राण अर्पण करणाऱ्या हुतात्म्यांना आदरांजली अर्पण करताना मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या सर्वोच्च बलिदानाचा सन्मान केला आणि गोव्याचे माजी मुख्यमंत्री स्व. श्री. मनोहर पर्रीकर यांचे स्मरण केले. पर्रीकर हे आधुनिक गोव्याचे शिल्पकार होते, ज्यांचे दूरदर्शी नेतृत्व गोव्याचे पहिले मुख्यमंत्री स्व. दयानंद बांदोडकर यांनी रचलेल्या विकासात्मक पायावर उभारले होते.
यावेळी बोलताना, डॉ. सावंत यांनी भारताच्या स्वातंत्र्यानंतर १४ वर्षांनी भारतीय संघराज्यात सामील होऊनही गोव्याने केलेल्या उल्लेखनीय प्रगतीवर भर दिला. १४ वर्षांनंतर गोव्याला स्वातंत्र्य मिळाले असले तरी, आज आपले राज्य शिक्षण आणि आरोग्य सुविधांसारख्या विविध क्षेत्रात आघाडीवर आहे. “आम्ही १०० टक्के साक्षरता दर गाठला आहे आणि ‘हर घर जल मिशन’ यशस्वीरित्या पूर्ण केले आहे ज्यामुळे राज्यातील प्रत्येक घराला नळाचे पाणी पुरविले जाते असे ते म्हणाले.
मुख्यमंत्र्यांनी सर्व गोव्यातील नागरिकांना आत्मनिर्भर गोवा उभारण्यासाठी हातभार लावण्याचे आवाहन केले. त्यांनी सरकार एकता, स्वच्छता, हरित आणि एक प्रमुख पर्यटन स्थळ म्हणून गोव्याची ओळख जपून विकासासाठी वचनबद्ध आहे यावर भर दिला. त्यांनी पर्यटकांना हार्दिक आमंत्रण दिले आणि गोवा प्रत्येक पर्यटकाचे अतिथी देवो भव या भावनेने स्वागत करतो.असे सांगितले.
या प्रसंगी पणजी येथील अग्निशमन अधिकारी श्री नीलेश फर्नांडिस, श्री अनिकेत अनंत आमोणकर आणि श्री जंगा आर. गोहर यांना गुणवंत सेवेसाठी मुख्यमंत्री अग्निशमन सेवा पदक प्रदान करण्यात आले.
श्री अविनाश यू. गावकर यांना मुख्यमंत्री अग्निशमन सेवा शौर्य पदक प्रदान करण्यात आले.
उत्कृष्ट सेवेसाठी मुख्यमंत्री पोलीस (सुवर्ण) पदक उपअधिक्षक श्री सागर पी. एकोस्कर, श्री राजेश कुमार, श्रीमती सुदीक्षा एस. नाईक, एएसआय श्री सुभाष मालवणकर, एचसी श्री भालचंद्र व्ही. सावंत, श्री मेल्विन डायस, पीसी श्री अमरदीप चौधरी यांना मुख्यमंत्री पोलीस पदक तर चालक, होमगार्ड्स श्री रमा जी. कांबळी, चालक, महिला होमगार्ड स्वयंसेवक विद्या यू. तलवार, सिव्हिल डिफेन्स वॉर्डन श्री रूपेश वाय. पर्वतकर आणि अॅड. हर्षा नाईक यांना मुख्यमंत्री गृहरक्षक पदक प्रदान करण्यात आले.
या प्रसंगी महसूल मंत्री श्री अतानासियो मोन्सेरात, विरोधी पक्षनेते श्री युरी आलेमांव, मुख्य सचिव श्री व्ही. कान्डावेलू, अॅड.जनरल देविदास पांगम, स्वातंत्र्य सैनिक, विद्यार्थी आणि इतर उपस्थित होते.
मा/वाप/दिबां/ एपी /रना/ २०२५/८६७

