गोव्याचे खरे सौंदर्य नैसर्गिक जलस्रोतांमध्ये – मुख्यमंत्री
१९ सप्टेंबर २०२५
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज गोव्याचे खरे सौंदर्य समुद्रकिनाऱ्यांमध्ये नाही तर त्याच्या नैसर्गिक जलस्रोतांमध्ये, परिसंस्थेत आणि समृद्ध जैवविविधतेमध्ये आहे असे मत व्यक्त केले आणि म्हणूनच राज्यातील नैसर्गिक जलस्रोतांचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी गंभीर प्रयत्न करणे काळाची गरज असल्याचे ते म्हणाले. पर्यावरण आणि हवामान बदल खात्याने आज पणजी जिमखाना येथे आयोजित केलेल्या ‘मिशन सरोवर पुर्ननिर्माण- गोव्याच्या तलावाची पुनर्कल्पना’ या विषयावरील परिषदेच्या उद्घाटन सत्रात ते बोलत होते.
मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी जलसंवर्धनाचे महत्त्व प्रतिपादून राज्यातील नैसर्गिक तलावांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी सरकारने गंभीर उपाययोजना सुरू केल्या आहेत असे सांगितले. गोवा राज्य विकसीत भारत, २०४७ आणि विकसित गोवा २०३७ चे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी पुढे जात असताना पर्यावरण आणि नैसर्गिक जलसंपत्तीच्या संवर्धनाला सर्वाधिक महत्त्व दिले पाहिजे असेही ते म्हणाले.
मुख्यमंत्र्यांनी राज्यात नैसर्गिक तलावांच्या संवर्धनात पंचायत संस्था आणि नागरिकांनी विशेषतः विद्यार्थी समुदायाने सक्रिय भूमिका बजावावी असे आवाहन केले. भूजल पातळीत घट आणि विविध कारणांमुळे होणारे जल प्रदूषण याबद्दल त्यांनी इशारा दिला. काही लोक जलसाठ्यांमध्ये कचरा टाकून, नद्या आणि तलावांमध्ये कचरा, प्लास्टिक टाकून अत्यंत बेजबाबदारपणे वागतात ज्यामुळे नजीकच्या भविष्यात पर्यावरणीय समस्या निर्माण होऊ शकतात. सरकारी प्रयत्नांव्यतिरिक्त, जलसाठ्यांचे संरक्षण आणि संवर्धन करण्यात लोकांचीही समान भूमिका आहे असे ते म्हणाले.
राज्यातील अनेक तलाव पुनरुज्जीवित करण्यासाठी सरकारने ३९ तलावांचा निवड केला आहे. भाभा अणु संशोधन केंद्राचे माजी शास्त्रज्ञ, पद्मश्री पुरस्कार विजेते डॉ. शरद काळे यांच्या मार्गदर्शनाखाली खात्याने ‘मिशन सरोवर पुर्ननिर्माण- गोवा तलावाची पुनर्कल्पना’ या विषयावर परिषद आयोजित केली होती. या सत्राचा उद्देश गोव्याच्या तलावाच्या पुनर्संचयनासाठी एक चौकट तयार करणे हा होता. या सत्राला विद्यार्थी समुदायाकडून उत्तम प्रतिसाद मिळाला आहे.
डॉ. शरद काळे यांनी आपल्या भाषणात जलसंपत्तीचे संवर्धन आणि त्या विषयावरील त्यांचे अभ्यास यावर सविस्तरपणे प्रकाश टाकला. राज्यातील नैसर्गिक तलावांच्या संवर्धनात विद्यार्थ्यांच्या सहभागावर त्यांनी भाषण केले.
सत्रादरम्यान जलसंवर्धनावर गट चर्चा झाली ज्यामध्ये राष्ट्रीय तज्ज्ञ डॉ. उदित भाटिया, डॉ. रघु मुर्तुगुड्डे, डॉ. मोहित प्रकाश मोहंती आणि डॉ. सुकदेव पाल यांनी त्यांचे विचार मांडले.
या प्रसंगी पर्यावरण सचिव श्री. अरुण कुमार मिश्रा, गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष, डॉ. लेव्हिन्सन मार्टिन्स आयएएस यांचीही यावेळी भाषणे झाली.
यावेळी जीएसपीबीच्या सदस्य सचिव डॉ. गीता नागवेंकर, जलस्त्रोत खात्याचे मुख्य अभियंता श्री. ज्ञानेश्वर सालेलकर, पर्यावरण खात्याचे संचालक श्री. सचिन देसाई उपस्थित होते.
मा/वाप/दिबां/ एपी /रना/ २०२५/६६६