कृत्रिम बुद्धिमत्तेने सक्षम अल्ट्रापोर्टेबल डिजिटल एक्स-रे सिस्टीमसह गोव्याचे क्षयरोग मुक्त राज्याच्या दिशेने पाऊल
५ सप्टेंबर २०२५
आरोग्य मंत्री श्री विश्वजीत राणे यांनी प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी यांच्या “क्षयरोग मुक्त भारत” या दृष्टिकोनाशी सुसंगत राहून गोवा राज्य क्षयरोग मुक्त राज्य बनण्याच्या दिशेने सातत्याने वाटचाल करीत आहे असे सांगितले. पणजी येथील मेनेझिस ब्रागांझा संस्थेच्या सभागृहात आयोजित एका विशेष कार्यक्रमात ते बोलत होते.
या प्रसंगी, रोटरी फाउंडेशन, रोटरी क्लब ऑफ पणजी रिव्हिएरा यांनी रोटरी क्लब ऑफ दोनापावला आणि रोटरी इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट्स – ३६४० (दक्षिण कोरिया), ५९३० (यूएसए) आणि ३१७० (भारत) यांच्या सहकार्याने जागतिक अनुदान जीजी२४७८२४२ अंतर्गत गोवा सरकारच्या आरोग्य सेवा संचालनालयाला एआय-सक्षम अल्ट्रापोर्टेबल डिजिटल एक्स-रे सिस्टम सुपूर्द केली.
या कार्यक्रमात बोलताना आरोग्यमंत्र्यांनी गोव्याच्या पायाभूत सुविधांना बळकटी देण्यात रोटेरियन्सच्या महत्त्वपूर्ण भूमिकेवर प्रकाश टाकला. टाटा मेमोरियल सेंटरच्या सहकार्याने विकसित केलेले अत्याधुनिक कर्करोग रुग्णालय लवकरच गोव्यात स्थापन केले जाईल अशी माहितीही त्यांनी दिली. जीव वाचविण्याच्या ध्येयावर भर देत श्री. राणे यांनी आरोग्य सेवा संचालनालयाला हे प्रगत निदान उपकरण समर्पित केल्याबद्दल रोटरी क्लबाचे आभार मानले.
या अनुदानाअंतर्गत, कृत्रिम बुद्धिमत्तेने सुसज्ज असलेल्या प्रोराड अल्ट्रापोर्टेबल डिजिटल एक्स-रे सिस्टमच्या चार युनिट्स गोव्यातील नावेली, बेतकी, कुडतरी आणि खोर्ली अशा चार प्राथमिक आरोग्य केंद्रांना योगदान देण्यात आले आहे.
हा उपक्रम रोटरी पणजी रिव्हिएरा आणि दोनापावला टीबी डायग्नोस्टिक्स अँड क्युअर प्रोग्रामचा एक भाग आहे, जो २०२५ पर्यंत टीबी मुक्त भारताच्या प्रधान मंत्र्यांच्या दृष्टिकोनाशी सुसंगत एक जागतिक अनुदान कार्यक्रम आहे.
या प्रकल्पाचा प्राथमिक उद्देश म्हणजे विशेषतः ग्रामीण आणि दुर्गम भागात क्षयरोगाचे लवकर निदान आणि वेळेवर उपचार करणे असा आहे, ज्यामुळे गोव्यातील वंचित आणि असुरक्षित घटकांना फायदा होईल. क्षयरोगाव्यतिरिक्त, या एआय-चलित एक्स-रे प्रणाली नियमित आरोग्य तपासणी दरम्यान फुफ्फुसाचा कर्करोग, फ्रॅक्चर आणि इतर छातीच्या आजारांचे निदान करण्यासही मदत करतील.
कार्यक्रमादरम्यान गोव्यातील वैद्यकीय सुविधा मजबूत करण्यात क्षयरोग एक्स-रे प्रणालीचा प्रभाव दर्शविणारा एक छोटासा व्हिडिओ दाखविण्यात आला. अनुदान देणगीदारांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाला आरोग्य सेवा संचालनालयाच्या संचालक डॉ. रूपा नाईक, रोटरीयन शरद पै, रोटरीयन हाँग क्यू जो, राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. मनीष गौणेकर, रोटरीयन जीत तोलानी, रोटरीयन अझीमा कुलकर्णी, रोटरीयन राजा मेलवानी, आरोग्य सेवा संचालनालयाचे अधिकारी, डॉक्टर, वरिष्ठ रोटेरियन आणि इतर उपस्थित होते.
रोटरी क्लब पणजी रिव्हिएरा च्या २०२४-२५ च्या अध्यक्षा रोटरीयन तन्वी सावंत यांनी स्वागत केले तर रोटरी क्लब ऑफ दोनापावलाच्या २०२४-२५ च्या सचिव रोटरीयन फिलिप आल्वारीस यांनी आभार मानले.
मा/वाप/दिबां/ एपी /रना/ २०२५/६३७