सुशासनासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शांचे अनुकरण करावे- मुख्यमंत्री
तारीख : १९ फेब्रुवारी २०२१
महान मराठा योद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचे आदर्श आणि विचार आत्मसात करण्यावर भर देऊन आत्मनिर्भर भारत स्वयंपूर्ण गोवा मोहिमे अंतर्गत केली जाणारी शाश्वत विकासकामे आणि सुशासनासाठी सरकारला सहकार्य करावे असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.
माहिती आणि प्रसिद्धी खात्याने बांदोडा ग्रामपंचायत आणि कवळे जिल्हा परिषद यांच्या सहकार्याने फर्मागुडी फोंडा येथे आयोजित केलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३९१ व्या जयंतीच्या कार्यक्रमात ते बोलत होते. जाती, वर्ण आणि धर्माच्या पलीकडील जनसामान्यांच्या कल्याणासाठी सरकार वचनबद्ध असल्याचा पुनरूच्चारही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केला.
महान मराठा राजा शिवाजी महाराजांना लोकांच्या हिताविषयी कळवळा होता आणि त्याच दिशेने आपले सरकार वाटचाल करीत आहे. लोकांचे प्रश्न आणि तक्रारी ऐकून घेण्यासाठी आणि पायभूत सुविधा, कल्याणकारी योजना आणि इतर सुविधांची माहिती देण्यासाठी १९१ ग्रामपंचायतींना भेट देणारा स्वयंपूर्ण मित्र हा या दिशेने उचललेले सरकारचे एक महत्वपूर्ण पाऊल असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
या सोहळ्याला कला व संस्कृती मंत्री श्री. गोविंद गावडे, आमदार श्री. रवी नाईक, फोंडा नगरपालिकेचे अध्यक्ष श्री. विश्वनाथ दळवी, जिल्हा पंचायत सदस्य श्री. श्रमेश भोसले, माहिती आणि प्रसिद्धी खात्याचे संचालक श्री. सुधीर केरकर आणि मुंबई येथील प्रमुख वक्ते श्री. चंद्रशेखर पाटील हे यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.
पुढील २५ वर्षांसाठी सुनियोजित विकासाचे आपले लक्ष्य असल्याचे सांगून छत्रपती शिवाजी महाराजांनी धर्म आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी तहोहयात अथकपणे वसाहतीय राजवटींशी लढा दिला. शिवाजी महाराजांनी कृषी संस्कृतीचा अंगिकार केला होता याचाही उल्लेख मुख्यमंत्र्यांनी केला.
केंद्र सरकारची मेक इन इंडिया ही कल्पना शिवाजी महाराजांच्याही काळी अस्तित्वात होती आणि भारतीय बनावटीची शस्त्रे, दारूगोळा आणि इतर साहित्य ते वापरीत होते. या उदाहराणाचे आपण अनुकरण करून मानवी जीवनामध्ये स्वयं निर्भर झाले पाहिजे असे मुख्यमंत्री पुढे बोलताना म्हणाले.
शिवाजी महारांजांचे विचार आणि इतिहासाची जाणीव लोकांना खासकरून युवापिढीला व्हावी या उद्देशाने शिव जयंती उत्सवाचे औचित्य साधून राज्यातील सर्व तालुक्यांमध्ये ऐतिहासिक नाटकांचे आयोजन केले आहे.
शिवाजी महाराजांच्या उत्कृष्ट गुणांचा आपण अंगिकार केला पाहिजे असे सांगून अशी नाटके पाहून आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र वाचून त्यांचे आचार विचार अंगी बाणवावे असे कला व संस्कृती मंत्री श्री गोविंद गावडे म्हणाले. शिवाजी महाराज एक चाणाक्ष, धूर्त आणि समर्थ प्रशासक होते आणि साहसी गुणांमुळे त्यांनी अनेक किल्ले सर केले होते. देशाच्या कानाकोपर्यात अनेक पुतळे असलेले ते एकमेव राजा आहेत असेही श्री. गावडे यांनी सांगितले.
मुंबई येथून आमंत्रित केलेल्या श्री चंद्रशेखर पाटील यांनी आपल्या बीजभाषणामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन आणि कार्याबद्दल विस्तृतपणे माहिती दिली.
माहिती आणि प्रसिद्धी खात्याचे संचालक श्री. सुधीर केरकर यांनी उपस्थितांचे स्वागत करून संपूर्ण दिवस चालणार्या कार्यक्रमाची थोडक्यात माहिती दिली. राज्य सस्तरीय समितीचे सदस्य श्री. नरेंद्र तारी यांनी प्रमुख वक्त्यांचा परिचय करून दिला. सहाय्यक माहिती अधिकारी श्री. श्याम गांवकर यांनी आभार प्रदर्शन केले.
सुरूवातील मुख्यमंत्री आणि इतर मान्यवरांच्या हस्ते शिवाजी माहाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरूवात झाली. यानंतर जगदंब ढोल पथक, खडपाबांध फोडा गोवा आणि जगदंब ढोल ताशा पथक गोवा यांच्यातर्फे कार्यक्रम सादर करण्यात आला. बालभवन, बांदोडाच्या विद्यांर्थ्यांनी स्वागतगीत आणि पोवाडे सादर केले.
मा/वाप/सुके/प्रना/पांना/ २०२१/१९५