गोवा कोरोना मुक्त करा- मुख्यमंत्री
तारीख : १२ फेब्रुवारी २०२१
नोवेल कोविड-१९ महामारीमुळे आम्ही खूप त्रास सहन केला पण आता कोविड १९ विषाणूपासून मुक्ती मिळविण्यासाठी लस मिळविण्यात आपण यशस्वी झालो आहोत असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले. ही लस घेऊन गोवा कोरोनामुक्त करावा असे आवाहन त्यांनी लोकांना केले. आत्मनिर्भर भारत आणि लसीकरण मोहिमेत भागीदारी केल्याबद्दल त्यांनी रिजनल आऊटरीच ब्युरो यांची प्रशंसा केली. लोक सरकारच्या हाकेला प्रतिसाद देतील आणि गोवा स्वयंपूर्ण आणि कोरोना मुक्त करण्यासाठी सहकार्य करतील अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.
कोविड-१९ लसीकरणाविषयी जागृती आणि आत्मनिर्भर भारत मोहिमेचा शुभारंभ करण्यासाठी मोबाईल व्हॅनला बावटा दाखविण्याच्या प्रसंगी डॉ. सावंत बोलत होते. हा कार्यक्रम आल्तिनो पणजी येथे भारत सरकारच्या माहिती आणि प्रसिद्धी मंत्रालयाच्या आश्रयाखाली महाराष्ट्र आणि गोवा रिजनल आऊटरीच ब्युरोतर्फे आयोजित केला होता.
पुढे बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, लोकांसाठी तयार केलेल्या आत्मनिर्भर भारत स्वयंपूर्ण गोंय मोहीमेकडे लक्ष देणे आवश्यक आहे जेणेकरून समाजातील तळागाळातील व्यक्तीही तिचा फायदा घेऊ शकेल.
डेअरी, कृषी, फलोत्पादन या क्षेत्रांमध्ये स्वयंपूर्ण होण्यावर भर देऊन मुख्यमंत्री म्हणाले की, या क्षेत्रांमध्ये स्वयंरोजगाराची शिखरे गाठण्याची युवकांना संधी आहे.
रिजनल आऊटरीच ब्युरोचे संचालक श्री संतोष अजमेरा यांनी पाहुण्यांचे स्वागता केले आणि प्रचार व्हॅनच्या शुभारंभाच्या कल्पनेविषयी माहिती दिली. त्यांनी मोबाईल व्हॅनची फ्रेम केलेली प्रतिकृती मुख्यमंत्र्यांना भेट दिली.
माहिती आणि प्रसिद्धी संचालनालयाचे संचालक श्री. सुधीर केरकर, आयटी संचालक श्रीमती अंकिता आनंद, एआयआर चे सहाय्यक संचालक श्री. तुषार जाधव, मुख्यमंत्र्यांचे स्वीय सचिव श्री. गौरीश कळंगुटकर, आरओबी पुणेचे फिल्ड अधिकारी श्री. प्रमोद खडंगळे आणि इतर यावेळी उपस्थित होते.
यावेळी सांस्कृतिक पथकाने आत्मनिर्भर भारत आणि कोविड-१९ शी लढा देण्याच्या विषयावर स्वागतगीते सादर केली.
मा/वाप/सुके/प्रना/पांना/ २०२१/१७५