नौदल आणि तटरक्षक दलाच्या सेवांची मुख्यमंत्र्यांकडून प्रशंसा

तारीख : ११ फेब्रुवारी २०२१

आयएल ३८ फ्रेम क्र. ३०३ संग्रहालयात बसवल्यामुळे गोव्यातील युवकांना सशस्त्र सेनादळामध्ये जाण्यास प्रेरणा मिळेल असे उद्गार मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सांवत यांनी काढले. पर्वरी येथील सचिवालयात आज भारतीय नौदल आणि भारतीय तटरक्षक दलाच्या अधिकार्‍यांशी झालेल्या थेट सुसंवादाच्या मालिकेमध्ये ते बोलत होते. नौदल जर त्यांच्या उन्नतीच्या कार्यक्रमांमध्ये गोव्यातील युवकांना सहभागी करीत असेल तर ती चांगलीच गोष्ट आहे असेही ते म्हणाले.

केंद्र सरकारच्या अधिकार्‍यांशी बोलत असताना मुख्यमंत्र्यांनी भारतीय नौदल आणि तटरक्षक दलाची प्रशंसा केली. गोवा प्रभागाचे फ्लॅग ऑफिसर रियर ऍडमिरल फिलिपोज जी. पिनूमुर्ती आणि तटरक्षक दलाचे गोवा विभागाचे डीआयजी हिमांशू नवटीयाल यांनी नौदलाचे प्रतिनिधीत्व केले.

मानवतावादी सहाय्य असो किंवा पुराच्या काळातील मदतकार्य असो, वैद्यकीय आणीबाणी असो किंवा समुद्रामधील जीवरक्षण असो, नौदल आणि तटरक्षक दलाने गोव्यासाठी नेहमीच उत्कृष्ट सेवा बजावली आहे. कोविड-१९ च्यावेळी नौदलाचे विमान सदोदित कार्यरत होते आणि दिल्लीहून आवश्यक पुरवठा आणत होते. पोहोच कार्यक्रमाचा भाग म्हणून नौदल आणि तटरक्षक दल गोव्यातील नागरीकांसाठी वैद्यकीय शिबिरे घेत आले आहेत. नौदल आणि तटरक्षकाच्या येथील युवकांबरोबरच्या सुसंवादाने मुख्यमंत्री प्रभावित झाले.

ग्रांडी बेटावर आणि त्याच्या आसपास बसवलेल्या नौदलाच्या संवेदनशील उपकरणाच्या नुकसानीबद्दल मुख्यमंत्र्यांनी चिंता व्यक्त केली. तिथे मासेमारी बंदी सूचनांची अंमलबजावणी करण्याचे आदेश त्यांनी मत्स्योद्योग खाते आणि तटीय पोलीसांना दिले. त्याचबरोबर ते क्षेत्र निषिद्ध क्षेत्र म्हणून जाहीर केले जावे असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.

प्रधानमंत्री आत्मनिर्भर भारत मोहिमेअंतर्गत राज्य सरकारने स्वयंपूर्ण गोव्यासाठीही पुढाकार घेतला असल्याचे मुख्यमंत्र्यांनी नौदल आणि तटरक्षक दलाच्या अधिकार्‍यांना सांगितले. गोवा स्वातंत्र्यांची ६०वर्षे साजरी करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन नौदल आणि तटरक्षक दलाच्या अधिकार्‍यांनी मुख्यमंत्र्यांना दिले.

मा/वाप/सुके/प्रना/पांना/ २०२१/१६४

Skip to content