विकसित गोवा २०३७ साध्य करण्यासाठी सरकारच्या प्रयत्नांना सहकार्य देण्याचे लोकांना आवाहन
२६ जानेवारी २०२६
सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री दिगंबर कामत यांनी आज २०३७ पर्यंत विकसित गोवा राज्य बनविण्याच्या सरकारी प्रयत्नांना पाठिंबा देण्याचे आवाहन केले. दक्षिण गोवा जिल्हाधिकारी कार्यालय, मडगाव येथे आयोजित प्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्रीय ध्वज फडकविल्यानंतर ते बोलत होते.
काही घटकांकडून शैक्षणिक संस्थांशी संबंधित कल्याणकारी प्रकल्पांवर होत असलेल्या आक्रमकतेबद्दल आणि विरोधाबद्दल मंत्री श्री. कामत यांनी निराशा व्यक्त केली. ते म्हणाले की जर आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शैक्षणिक संस्थांना परवानगी दिली गेली तर गोवा येणाऱ्या पिढ्यांसाठी उच्च दर्जाच्या शैक्षणिक पायाभूत सुविधा निर्माण करू शकेल ज्याचा फायदा आपल्या विद्यार्थी समुदायाला मोठ्या प्रमाणात होईल. अशा प्रकारे लोकांनी अशा शैक्षणिक प्रकल्पांचे महत्त्व समजून घेतले पाहिजे आणि कल्याणकारी प्रकल्पांना सहकार्य दिले पाहिजे ज्यामुळे विकसित गोवा -२०३७ चे उद्दिष्ट साध्य होईल असे ते म्हणाले.
श्री. कामत यांनी सरकारकडून राबविल्या जाणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांवर भर दिला ज्याचा मोठ्या प्रमाणात लोकांना फायदा होत आहे असे त्यांनी सांगितले. अलीकडेच सुरू करण्यात आलेली माझे घर योजना २०१४ पूर्वी सामुदायिक जमिनीवर बांधलेल्या घरांचे कायदेशीर हक्क मिळवून देण्यासाठी लोकांना खूप फायदेशीर ठरली आहे. मुख्यमंत्री रोजगार योजनेद्वारे सरकार राज्यातील तरुण उद्योजकांना सहकार्य देत आहे. तसेच दिव्यांगांनाही सहकार्य करीत आहे. राज्यात पर्पल फेस्टच्या यशस्वी आयोजनामुळे दिव्यांग लोकांना त्यांचे कौशल्य आणि प्रतिभा दाखविण्यासाठी एक समावेशक व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. मडगाव शहरात नुकत्याच झालेल्या बाल महोत्सव ‘बुल बुल’ मध्ये चित्रपट, सर्जनशीलता आणि सांस्कृतिक मूल्यांबद्दल बाल समुदायाचा मोठा उत्साह दिसून आला असे त्यांनी सांगितले.
राज्यातील तिसरा जिल्हा कुशावती स्थापन करण्याच्या सरकारच्या निर्णयाचे मंत्री श्री. कामत यांनी कौतुक केले. हा तिसरा जिल्हा प्रशासन लोकांच्या दाराशी पोहोचविण्यास सरकारला मदत करील असे ते म्हणाले. त्यांनी प्रत्येक नागरिकाला राष्ट्रीय विकासात योगदान देण्याचे आवाहन केले. सामूहिक प्रयत्नांमुळे भारत लवकरच जागतिक महासत्तेचा दर्जा प्राप्त करील.
श्री. कामत यांनी पोलिस पथकाकडून मानवंदना स्वीकारली आणि त्यांनी पोलिस पथक, होमगार्ड, एनसीसी कॅडेट्स आणि विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या मार्च पास्टची पाहणी केली.याप्रसंगी मडगाव परिसरातील विविध शाळांमधील शालेय मुलांनी देशभक्तीपर गीते आणि सांस्कृतिक नृत्य सादर केले.
याप्रसंगी नावेलीचे आमदार, श्री. उल्हास तुयेंकर, दक्षिण गोवा जिल्हाधिकारी श्रीमती एग्ना क्लीटस, आयएएस, पोलिस अधिक्षक, दक्षिण गोवा श्री. टिकम सिंग वर्मा, आयपीएस आणि वरिष्ठ अधिकारी, स्वातंत्र्यसैनिक आणि इतर प्रमुख व्यक्ती उपस्थित होत्या.
मा/वाप/दिबां/ एपी /रना/ २०२६/

