Latest NewsMarathi Press ReleasePress Releases

राज्याची प्रतिमा आपल्यासाठी सर्वोच्च- मुख्यमंत्री

१७ नोव्हेंबर २०२५

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज पणजी येथील मिनेझिस ब्रागांझा संस्थेत आयोजित केलेल्या राष्ट्रीय पत्रकार दिन समारंभात सरकार पत्रकारांसोबत आहे आणि पत्रकारांशी संबंधित समस्यांकडे सरकार नेहमीच लक्ष देईल असे आश्वासन दिले. राष्ट्रीय पत्रकार दिन समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी माहिती आयुक्त तथा सचिव श्री सरप्रीत सिंग गिल, आयएएस, सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित होते.

डॉ. सावंत यांनी यावेळी बोलताना सत्य नेहमीच महत्त्वाचे असते आणि ते लोकांसमोर आले पाहिजे. वृत्तांकन करताना, कथेच्या दोन्ही बाजू समजुन घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. सरकार राज्याच्या विकासासाठी काम करीत आहे आणि चांगले काम करताना सरकारवर टीका करून लोकांचे तसेच राज्याचे नुकसान करू नये. राज्याची प्रतिमा आपल्यासाठी सर्वोच्च आहे आणि ती टिकवून ठेवण्यासाठी आपण काम करूया असे डॉ. सावंत म्हणाले.

पुढे बोलताना मुख्यमंत्र्यांनी पत्रकार आणि प्रसार माध्यमांचे प्रश्न आणि मागण्या सोडविण्यासाठी लक्ष घालणार असल्याचे आश्वासन दिले.

मुख्यमंत्री डॉ सावंत यांच्याहस्ते पत्रकारितेत दिलेल्या योगदानाबद्दल ज्येष्ठ पत्रकार आणि प्रसिद्ध व्यंगचित्रकार श्री आलेक्स राफेल फर्नांडिस यांना जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. श्री आलेक्स फर्नांडिस यांनी या सन्मानाबद्दल सरकारचे आभार मानले.

याप्रसंगी मुख्यमंत्र्यांहस्ते द गोअन एव्हरीडेचे वरिष्ठ पत्रकार आणि संपादक श्री. जोएल अफोंसो, तरुण भारतचे वरिष्ठ पत्रकार श्री. जय नाईक, ज्येष्ठ पत्रकार श्री. अतुल पंडित भांगरभूय, नवप्रभाचे वरिष्ठ पत्रकार श्री. बबन भगत आणि द नवहिंद टाईम्सचे वरिष्ठ छायाचित्रकार श्री. नंदेश कांबळी यांचा सत्कार करण्यात आला.

गोवन वार्ताचे उत्कृष्ठ संपादक श्री. पांडुरंग गावकर यांना ( राष्ट्रीय एकात्मता आणि सांमाजिक सलोखा, उत्कृष्ठ गटात पुरस्कार प्राप्त झाला), लोकमतचे पत्रकार श्री. अजय बुवा ( ग्रामीण वार्तांकन), सार्वजनिक आरोग्य आणि स्वच्छता पत्रकारिता गटात नवहिंद टाईम्सचे वरिष्ठ उपसंपादक आणि पत्रकार रमणदीप कौर, श्रीमती विभा वर्मा ( महिला आणि मुले/सामाजिक विषयावरील विशेष संदर्भात वार्तांकन), श्री. मार्कुस मेरगुल्हाव ( क्रीडा वार्तांकन), श्रीमती गौरी मळकर्णेकर ( कला आणि संस्कृतीवरील वार्तांकन), श्री. राजतिलक नाईक ( छायापत्रकारिता-वर्षातील सर्वोत्कृष्ट छायाचित्र), श्रीमती क्रिस्टीन माशादो ( शिक्षणावरील वार्तांकन) आणि श्री. समीप नार्वेकर ( सरकारच्या कामगिरीवरील वार्तांकन) यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.

गोवा राज्य छायाचित्र स्पर्धा आणि प्रदर्शन २०१४ या योजनेअंतर्गत झालेल्या छायाचित्र स्पर्धेचे निकाल जाहीर करण्यात आले आणि विकसित गोवा – राज्याचा सर्वांगीण विकास या श्रेणीत श्री अरुणाभ भट्टाचार्य (प्रथम पारितोषिक), श्री सिद्धेश मयेंकर (द्वितीय पारितोषिक), श्री अभिनव भट्टाचार्य (तृतीय पारितोषिक) यांना देण्यात आले. उत्तेजनार्थ बक्षिसे अक्षंदा राणे, श्री. गणेश शेटकर, श्री अमृत रमाकांत शेट, श्री नारायण पिसुर्लेकर आणि श्री प्रमोद ठाकूर याना देण्यात आली.

तद्नंतर पत्रकारितेत महिला, आव्हाने आणि संधी या विषयावर चर्चासत्र झाले. त्यात ज्येष्ठ पत्रकार देविका सिक्वेरा, श्रीमती गौरी मळकर्णेकर, श्रीमती संगिता नाईक, श्रीमती डायना फर्नांडिस, श्रीमती प्रज्ञा गांवकर यांनी भाग घेतला.

माहिती संचालक श्री दिपक बांदेकर यांनी आपल्या स्वागतपर भाषणात राष्ट्रीय पत्रकार दिनाचे महत्व सांगितले. पत्रकारांच्या कल्याणासाठी खात्यातर्फे अंमलबजावणी करम्यात येणाऱ्या योजनांची माहिती दिली.

माहिती खात्याचे संयुक्त संचालक श्री प्रवीण शिरोडकर, माहिती अधिकारी श्री ऑलविन परेरा, सहाय्यक लेखा अधिकारी श्रीमती हेझल आल्मेदा, कार्यालय अधिक्षक श्री शैलेश नाईक, माहिती आणि प्रसिद्धी खात्याचे कर्मचारी उपस्थित होते.

माहिती सहाय्यक कु. उत्कर्षा भुस्कुटे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

मा/वाप/दिबां/ एपी /रना/ २०२५/८२२

Skip to content