राज्यपालांकडून सर्वांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा
पणजी: १८ मार्च २०२६
गोव्याचे राज्यपाल श्री. पुसापती अशोक गजपती राजू यांनी गुढीपाडव्याच्या शुभ प्रसंगी गोव्याच्या जनतेला मनःपूर्वक शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.
आपल्या संदेशात राज्यपाल म्हणतात, की “गुढीपाडवा हा सण पारंपारिक नववर्षाची सुरुवात असते. हा सण म्हणजे नवी सुरुवात, आशा व समृद्धीचे प्रतीक आहे. हा उत्सव आपल्या देशाचा समृद्ध असा सांस्कृतिक वारसा प्रतिबिंबित करतो आणि आपल्याला सलोखा, एकता व सामूहिक प्रगती या शाश्वत मूल्यांची आठवण करून देतो.”
“आपल्या विविधतेने नटलेल्या देशामध्ये, हा उत्सव वेगवेगळ्या नावांनी साजरा केला जातो. आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये हा सण ‘उगादी’ म्हणून पाळला जातो, तर सिंधी समाज बांधव भगवान झुलेलाल यांच्या जयंतीनिमित्त ‘चेटी चांद’ या नावाने हा उत्सव साजरा करतात. राज्यांनुसार या उत्सवांची नावे आणि चालीरीती बदलत असल्या, तरी त्याचा मूळ भाव मात्र तोच असतो, जो नवनिर्मिती, आशा, समृद्धी आणि भारताच्या चैतन्यमय सांस्कृतिक एकतेचा उत्सव साजरा करतो,” असे राज्यपालांनी आपल्या संदेशात पुढे नमूद केले आहे.
“हा सण सर्वांसाठी शांतता, सुख आणि समृद्धी घेऊन येवो. गुढीपाडव्याच्या या आनंददायी प्रसंगी आपण पुन्हा एकदा गोव्याच्या जनतेला मनःपूर्वक शुभेच्छा देतो,” असे राज्यपाल शेवटी आपल्या संदेशात म्हणतात.
