Latest NewsMarathi Press ReleasePress Releases

फोंडा येथे नवीन नागरी पुरवठा कार्यालयाचे उद्घाटन

११ मार्च २०२६

फोंडा येथील कृषी बाजार संकुलात नवीन फोंडा तालुका नागरी पुरवठा कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत ३.१७ कोटी रुपयांचे कमिशन स्वस्त धान्य दुकान विक्रेत्यांना वितरीत करण्यात आले. सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील तांत्रिक सुधारणांवरील कार्यशाळाही आयोजित करण्यात आली होती.

या कार्यक्रमात सार्वजनिक वितरण व्यवस्थेत स्वस्त धान्य दुकान विक्रेत्यांची महत्त्वाची भूमिका प्रतिपादली. ते लाभार्थ्यांपर्यंत अन्नधान्य आणि जीवनावश्यक वस्तू पोहोचविण्यात शेवटच्या टप्प्यातील महत्त्वाचा दुवा म्हणून काम करतात. अन्न सुरक्षेसाठी हजारो लोक त्यांच्यावर अवलंबून असतात. सार्वजनिक वितरण व्यवस्थेत पारदर्शकता, कार्यक्षमता आणि जबाबदारी सुधारण्याच्या उद्देशाने तांत्रिक उपक्रमांवर कार्यशाळेत लक्ष केंद्रित करण्यात आले.

यावेळी बोलताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्वस्त धान्य दुकान विक्रेते हे प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना, मुख्यमंत्री स्वस्त धान्य दुकान उपक्रम आणि नागरी पुरवठा खात्याच्या इतर योजनांचे खरे प्रतिनिधी आहेत असे सांगितले. अनेक स्वस्त धान्य दुकाने पिढ्यानपिढ्या समाजाची सेवा करीत आहेत आणि लोकांसाठी अन्न सुरक्षा सुनिश्चित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावित असल्याचे ते म्हणाले. मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सरकार विक्रेत्यांना सहकार्य देत राहील आणि भविष्यात त्यांचे कमिशन वाढविण्यासाठी काम करील असे आश्वासन दिले. लोकांना फायदा देत असताना स्वस्त धान्य दुकाने शाश्वत राहिली पाहिजेत असेही त्यांनी सांगितले.

सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या आधुनिकीकरणाच्या प्रयत्नांचा उल्लेख करताना, मुख्यमंत्र्यांनी सेवा वितरण सुधारण्यासाठी अनेक उपक्रम सुरू करण्यात आले आहेत असे सांगून यामध्ये अन्नधान्याची दारापर्यंत डिलिव्हरी, स्मार्ट रेशन कार्ड आणि वाहन स्थान ट्रॅकिंग सिस्टम यांचा समावेश आहे असे ते म्हणाले. एईपीओएस उपकरणांसह इलेक्ट्रॉनिक वजनकाट्यांचे एकत्रीकरणही राबविण्यात आले आहे. त्यांनी एलपीजी सिलिंडर रिफिलिंगसाठी मुख्यमंत्री आर्थिक सहाय्य योजना २०२३ वरही प्रकाश टाकला. सध्या, १०,२६४ पैकी ६,२४७ एएवाय अंत्योदय अन्न योजना रेशनकार्डधारक लाभ घेत आहेत. जागतिक आव्हानांना न जुमानता भारत सरकार आणि गोवा सरकार एलपीजी सिलिंडरचा अखंड पुरवठा करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.

या कार्यक्रमाला फोंडा नगरपालिकेचे नगराध्यक्ष श्री विरेंद्र ढवळीकर, माजी खासदार नरेंद्र सावईकर, नागरी पुरवठा सचिव, नागरी पुरवठा संचालक, जिल्हा पंचायत सदस्य प्रीतेश गावकर, स्वस्त धान्य दुकान विक्रेते आणि नागरी पुरवठा आणि ग्राहक व्यवहार खात्याचे इतर अधिकारी उपस्थित होते.

मा/वाप/दिबां/ एपी /रना/ २०२६/१७६

Skip to content