गोव्यात ७७ वा प्रजासत्ताक दिन साजरा, संवैधानिक मूल्ये आणि विकासावर भर देण्याचे राज्यपालांचे आवाहन
२६ जानेवारी २०२६
गोवा विद्यापीठ मैदान, ताळगाव येथे आयोजित कार्यक्रमात भारताचा ७७ वा प्रजासत्ताक दिन देशभक्तीच्या आणि उत्साहाच्या भावनेने साजरा करण्यात आला. भारत देशाने आपले संविधान स्वीकारल्याचा इतिहासिक दिवस साजरा करण्याचा आणि संविधानाने नागरिकांना दिलेली लोकशाही मुल्ये उचलून धरण्यासाठी, लोकशाही संस्था मजभूत करण्यास आणि आपल्या राष्ट्राची प्रगती आणि एकतेसाठी काम करण्यास आपल्या सामुदायिक वचनबध्दतेची खात्री देण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिक, विद्यार्थी आणि अधिकारी सोहळ्यास उपस्थित होते.
या उत्सवाची सुरुवात नौदल, सशस्त्र दल, गोवा पोलिस, होमगार्ड्स, एनसीसी आणि शालेय विद्यार्थ्यांच्या पथकांनी शिस्त, समन्वय आणि समर्पणाचे दर्शन घडवून आणणाऱ्या प्रभावी समारंभाच्या संचलनाने झाली. शालेय विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते आणि नृत्य सादर केले.
सुरवातीस राज्यपाल श्री पुसापती अशोक गजपती राजू यांनी राज्य पातळीवरील प्रजासत्ताक दिन सोहळ्यात राष्ट्रीय तिरंगा फडकविला व मानवंदना दिली आणि संचलनाची पाहणी केली व भाषण केले.
याप्रसंगी बोलताना राज्यपाल श्री पुसापती अशोक गजपती राजू यांनी संविधान हे राष्ट्राचे मार्गदर्शक ज्योत आहे, जे न्याय, स्वातंत्र्य, समानता आणि बंधुत्वाच्या आदर्शांना मूर्त रूप देते असे सांगितले. प्रजासत्ताक दिन हा प्रत्येक नागरिकाच्या या मूल्यांचे समर्थन करण्याच्या आणि लोकशाही संस्थांना बळकट करण्याच्या जबाबदाऱ्यांवर चिंतन करण्याची संधी आहे असे त्यांनी सांगितले. विकसित भारत २०४७ च्या दिशेने भारताच्या प्रगतीवर प्रकाश टाकताना, राज्यपालांनी या राष्ट्रीय उद्दीष्टांच्या धरतीवर गोवा राज्याने सामाजिक न्याय व्यवस्थेसह एकत्रित आर्थिक वाढ, पर्यावरणाच्या जबाबदारीसह तंत्रज्ञान प्रगती आणि सांस्कृतिक जतनासह दिर्घकाळाच्या आणि समावेशक विकासाच्या दृष्टिकोनातून विकसित गोवा २०३७ च्या उद्दीष्टाकडे वाटचाल सुरू केल्याचे सांगितले.
सरकारने अनेक कल्याणकारी योजना सुरू करून लोकांचे जीवन सुधारण्यावर भर दिलेला आहे. ग्रामीण समाज आणि महिलांचे सशक्तिकरण, कौशल्य आणि सक्षमता वाढ यावर सरकारने भर दिलेला आहे. शिक्षण हे गोव्याच्या विकास धोरणाचा मजबूत पाया आहे हे लक्षात घेवून सरकारने उच्च शिक्षण, वैज्ञानिक संशोधन साधनसुविधा, भाषिक तंत्रज्ञान, शिक्षणशाखा विकासातील गुंतवणूक आणि शिक्षण संस्थां आणि उद्देगांच्या सहकार्यातून आधुनिक शिक्षण आणि इनोव्हेशन हब म्हणून गोव्याचे स्थान मजबूत करण्यावर भर दिला, असेही राज्यपालानी सांगितले.
या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील अपवादात्मक योगदानासाठी राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार प्रदान करण्यात आले. यामध्ये सरकारी खात्यांमधील अनुकरणीय सेवेसाठी पुरस्कार, सर्वोत्कृष्ट नियोक्ता, सर्वोत्तम स्वयंसेवी संस्था आणि सर्वोत्तम उद्योजकांसाठी २०२५ चे दिव्यांग व्यक्ती कल्याणासाठी राज्य पुरस्कार तसेच सेंद्रिय आणि शाश्वत शेतीमधील उत्कृष्टतेसाठी विशेष पुरस्कारांसह कृषी रत्न आणि कृषी विभूषण पुरस्कारांचा समावेश होता. पोलिस अधिक्षक (गुन्हे) श्री राहुल गुप्ता, आयपीएस यांना २०२४ साठी केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदक (तपास) ने सन्मानित करण्यात आले.
या समारंभाला मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत, केंद्रीय राज्यमंत्री श्री श्रीपाद नाईक, वीज मंत्री श्री रामकृष्ण उर्फ सुदिन ढवळीकर, कॅनडाचे ईसीए आमदार श्री राजन साहनी, मुख्य सचिव डॉ. व्ही. कांदावेलू, आयएएस, पोलिस महासंचालक, वरिष्ठ सरकारी अधिकारी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
मा/वाप/दिबां/ एपी /रना/ २०२६/

