Home »News

पणजीत २९ ऑक्टोबर रोजी मतदार नोंदणी जागृती रॅलीचे आयोजन

 

दि. २४ ऑक्टोबर २०१८

       कार्तिक २,१९४०

 

वयाची १८ वर्षे पूर्ण केलेल्या युवकांनी आणि ०१ जानेवारी २०१९ पर्यंत वयाची १८ वर्षे पूर्ण करणार्‍या युवकांनी मतदाता म्हणून नोंदणी करण्यासाठी जागृती करण्याच्या उद्देशाने उत्तर गोवा जिल्हा निवडणूक अधिकारी श्री. लॅविन्सन मार्टिन यांनी पणजी येथील जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा आयकॉन्सची बैठक घेतली. ते म्हणाले, नागरिकांनी स्वेच्छेने नोंदणी करणे आणि प्रत्येक निवडणूकीत मतदान करणे हेच स्वीपचे ध्येय आहे.

श्री. मार्टिन यांनी अधिकाधिक मतदार नोंदणी होण्यासाठी जिल्हा आयकॉन्सना विविध माध्यमांद्वारे जागृती करण्याचे आवाहन केले. एकही मतदार मागे राहता कामा नये हे भारतीय निवडणूक आयोगाचे ध्येय आहे आणि स्वीप कार्यक्रमाद्वारे हे ध्येय साध्य करण्याचा आम्ही प्रयत्न केला पाहिजे. जिल्हाधिकार्‍यांनी सर्व आयकॉन्सना सहकार्य करण्याचे आणि या ध्येयाप्रती काम करण्याचे आवाहन केले.

या कार्यक्रमाचा भाग म्हणून आयकॉन्ससहित जिल्हाधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकारी यांची दोन मतदारसंघाना भेट - डीईओ / आयकॉन्सची दारोदारी भेट, आयकॉन्सच्या संदेशासहित रेडिओ प्रचार अशा उपक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे.

तसेच २९ ऑक्टोबर २०१८ रोजी पणजी येथे सायंकाळी ४.०० वाजता चर्च स्क्वेअर, १८ जून मार्ग ते विशाल मेगा मार्ट, एम. जी. रोड वरून आझाद मैदानापर्यंत रॅली काढण्याचेही ठरविण्यात आले आहे.

यावेळी आयकॉन्सना स्वीप पोस्टर्स देण्यात आले.

          वयाची १८ वर्षे पूर्ण केलेल्यांनी www.nvsp.in या संकेतस्थळाला भेट देऊन मतदार म्हणून नोंदणी करावी असे आवाहन जिल्हाधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी केले आहे.

          अतिरिक्त जिल्हाधिकारी श्री. गोपाळ पार्सेकर, उपजिल्हाधिकारी श्री. तुषार हळर्णकर आणि जिल्हाधिकारी कार्यालयातील मामलेदार श्रीमती सपना बांदोडकर यावेळी उपस्थित होत्या.

          लोकप्रतिनिधी आणि नागरी अधिकार्‍यांसोबत कु. सोनिया शिरसाट, श्री. तपन आचार्य, कु. आंतोनेत डिसोजा, कु. सुचिता नार्वेकर, श्री. राजदीप नाईक, श्री. दिलीप वझे, श्री. जॉन आगियार, डॉ. जर्वासियो मेंडीस, उत्तर गोव्यासाठी स्वीप प्रमुख अधिकारी श्री. सुदेश गावडे, समाजकल्याण खात्याच्या सहायक संचालक कु. शांभवी गांवकर, गोवा कॅनचे रोलन्ड मार्टिन्स आणि महिला व बालकल्याण खात्याचे प्रतिनिधी बैठकीला उपस्थित होते.

 

मा/वाप/टीएसएस/रना/रेधु/अगां/२०१८/१७१८

TOP