Home »News

गोवा राज्य रॅबिज नियंत्रण कार्यक्रमातील भागधारकांची बैठक संपन्न

 

दि. २३ ऑक्टोबर २०१८

 कार्तिक १,१९४०

 

गोवा राज्य रॅबिज नियंत्रण कार्यक्रमातील भागधारकांची, काल शहरातील पाटो येथे बैठक झाली. मिशन रॅबिज आणि डब्लूव्हीएसचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ल्युक गॅम्बल हे बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. राज्यातून रॅबिज हद्दपार करण्यावर चर्चा करण्यासाठी ही बैठक घेण्यात आली होती. सरकार, बिगर सरकारी संस्था आणि आंतरराष्ट्रीय संघटनेचे भागधारक बैठकीला उपस्थित होते.

भारतात, जेथे जगातील एक तृतीयांश मानवी रॅबिज मृत्यू होतात, अशा ठिकाणी त्यांच्या रॅबिज प्रवासाबद्दल बोलताना डॉ. गॅम्बल म्हणाले, आम्ही १४ शहरांमध्ये श्वान लसीकरण मोहीम राबविली. आमच्या मिशन रॅबिज ट्रकद्वारे अवघ्या २५ दिवसांत ५०,००० श्वानांचे ध्येय आम्ही गाठले आणि शेवटी ६१,००० पेक्षाही अधिक श्वानांचे रॅबिज विरोधी लसीकरण करण्यात आले.

पुढे बोलताना डॉ. गॅम्बल म्हणाले, ४ वर्षांत आम्ही जगभरातील स्वयंसेवकासह ५ विविध देशांमध्ये काम करीत आहोत. लसीकरण, शिक्षण, तंत्रज्ञान, संशोधन आणि खूप मेहनत याद्वारे रॅबिजची लागण झालेल्या जिल्ह्यांमध्ये या रोगाच्या उच्चाटनासाठी कार्य करीत आहोत. गोवा हे छोटे राज्य असल्याने योग्यरित्या प्रयत्न झाल्यास रॅबिजमुक्त होण्यासाठी अधिक वेळ लागणार नाही.

पशुवैद्यकीय आणि पशुसंवर्धन सेवा संचालक डॉ. संतोष देसाई यांनी आपल्या स्वागतपर भाषणात मिशन रॅबिजसोबत काम करताना आनंद झाल्याचे सांगितले. गेल्या ३ वर्षांत मिशन रॅबिजने रॅबिजच्या उच्चाटनाच्या कार्यात सुधारणा दर्शविली आहे. या कार्यक्रमांतर्गत ३ लाख श्वानांचे लसीकरण करण्यात आले असून यापुढे प्रयोगशाळा तपासणीसहित परिणामकारक देखरेख यंत्रणा उभारण्याचा विचार आहे. तसेच तोंडावाटे दिल्या जाणार्‍या लसीकरणासारख्या नवीन पध्दतींवरही काम करण्यात येईल.

पुढे बोलताना डॉ. देसाई म्हणाले, राज्य सरकार आणि देशातील विविध घटकांचा रॅबिज नियंत्रणावरील दृष्टीकोन लक्षात घेऊन आमचे प्रयत्न सुधारणे आणि रॅबिज नियंत्रणात उत्कृष्ट काम करणे हेच या बैठकीचे उद्दिष्ट आहे.

बैठकीत लसीकरण, शिक्षण आणि देखरेख यावर चर्चा करण्यात आली. गोवा सरकार २०२० पर्यंत श्वानापासून मानवाला झालेली रॅबिज नष्ट करणे, २०२३ पर्यंत श्वान रॅबिज मृत्यू मुक्त होणे, २०२५ पर्यंत रॅबिज मुक्ततेची घोषणा करणे इत्यादी उद्दिष्टे ठरविण्यात आली.

पीसीबीचे तांत्रिक अधिकारी डॉ. ज्ञानेन्द्र गोंगल, बंगलूरू येथील एनआयएमएच न्यूरो सायन्सचे सहयोगी प्रा. डॉ. रिटा मणी, पशुवैद्यकीय सल्लागार डॉ. चंद्रशेखर साहुकार, बंगलूरूच्या पशुवैद्यकीय मायक्रोबायोलॉजीचे सहयोगी प्रा. डॉ. श्रीकृष्ण इसलूर , आरोग्य सेवा संचालानालय एनआरसीपीसाठी राज्य प्रमुख अधिकारी आयसीएआरचे संचालक डॉ. इ.बी. चकुकर, डॉग ट्रस्टचे सीईओ श्री. एड्रीयन बर्डर, इडनबर्ग विद्यापीठाचे विश्वस्त, डब्लूव्हीएस प्रा. रिचर्ड मेलनबी व त्यांचा समूह बैठकीला उपस्थित होता.

 

मा/वाप/टीएसएस/रना/रेधु/अगां/२०१८/१७११

TOP