Home »News

गोमेकॉतील जैववैद्यकिय कचरा व्यवस्थापन आणि मलनिस्सारण प्रकल्पास राज्यपालांची भेट

                                                        दि.२६ सप्टेंबर २०१८

                                                        आश्विन ०४,१९४०

 

गोव्याच्या राज्यपाल डॉ. मृदुला सिन्हा यांनी आज बांबोळी येथील गोवा वैद्यकिय महाविद्यालयातील जैववैद्यकिय कचरा व्यवस्थापन(बीडब्ल्यूडब्ल्यू) आणि मलनिस्सारण प्लांटला भेट दिली. यावेळी आरोग्यमंत्री श्री. विश्वजित राणे, गोमेकॉ चे डीन डॉ. प्रदिप नाईक, वैद्यकिय अधिक्षक डॉ. शिवानंद बांदेकर, अतिरिक्त सचिव(आरोग्य) श्री. सुनिल मसूरकर, अवर सचिव श्रीमती तृप्ती मणेरकर, गोमेकोचे संचालक(प्रशासन) श्री. दत्ताराम सरदेसाई आणि इतर उपस्थित होते. 

या प्रसंगी बोलताना, रूग्ण इस्पितळाला मंदिर आणि डॉक्टरला देव मानतो. आरोग्याचा प्रश्न येतो तेव्हा गोमेकॉचे प्रशासन आरोग्य सेवांच्या बाबतीत नेहमीच अग्रेसर असते आणि भविष्यात अशा पद्धतीची सेवा चालूच राहणार अशी आशा आपण बाळगते असे राज्यपाल म्हणाल्या.

सुरूवातीला, डॉ. बांदेकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले आणि आगामी जैववैद्यकिय कचरा व्यवस्थापन(बीडब्ल्यूडब्ल्यू) आणि मलनिस्सारण प्रकल्पाची थोडक्यात माहिती दिली. विविध कायदेशीर बाबी आणि प्रकल्पामध्ये अनुसरण्यात येणार्‍या कचरा वेगळा करण्याच्या प्रणालीविषयी त्यांनी माहिती दिली. या प्रकल्पात गोमेकॉ आणि इतर सरकारी इस्पितळांमधून दरदिवशी ९०९ किलो जैववैद्यकिय कचरा येतो. विविध प्रकारचा कचरा वेगळा करण्यासाठी त्याठिकाणी वेगवेगळ्या रंगानिशी ओळखू येणार्‍या कचरा पेट्या आहेत. येथे परिचारिकांना आणि इतर कर्मचार्‍यांना वेळोवेळी पद्धतशीर प्रशिक्षण दिले जाते, असे ते म्हणाले.

तद्नंतर राज्यपालांनी नियोजित सुपरस्पेशलीटी विभागाच्या बांधकामाच्या भागास  देऊन त्या प्रकल्पाचा आढावा घेतला. तेथे त्यांनी एक रोपटे लावून अधिकार्‍यांना आसपासचा परिसर स्वच्छ व हरित ठेवण्याचा सल्ला दिला.

मा/सप/टीएसएस/जॉआ/पांना/पपा/२०१८/१५९२

 

TOP