Home »News

प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा २३ सप्टेंबर रोजी राज्यपालांच्याहस्ते शुभारंभ

                                                              दि.२१ सप्टेंबर २०१८

                                                              भाद्रपद ३०,१९४०

 

प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा शुभारंभ दि. २३ सप्टेंबर २०१८ रोजी दोनापावल येथील डॉ.एस.झेड.कासीम प्रेक्षागृहात सकाळी ११.३० वाजता राज्यपालांच्या हस्ते होणार आहे.

          या प्रसंगी केंद्रीय आयुष मंत्री श्री. श्रीपाद नाईक, सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. रामकृष्ण ढवळीकर, नगर नियोजन मंत्री श्री. विजय सरदेसाई, महसूल मंत्री श्री. रोहन खंवटे, कला व संस्कृती मंत्री श्री. गोविंद गावडे, आरोग्य मंत्री श्री. विश्वजित राणे, लोकसभा खासदार श्री. नरेंद्र सावईकर, श्री. विनय तेंडूलकर आणि इतर मान्यवर उपस्थित असतील.

          राष्ट्रीय आरोग्य मिशन/गोवा राज्य आरोग्य संस्थेच्या अंतर्गत राज्य आरोग्य एजन्सी स्थापन करण्यात आली आहे. ग्रामीण भागातील २१३७१ आणि शहरी भागातील १५१६८  मिळून एकूण ३६५३९ कुटुंबे प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेसाठी पात्र ठरली आहेत. पंचायत आणि आरोग्य सेवा संचालनालयाच्या आरोग्य कक्षांमध्ये पात्र ठरलेल्या लोकांची यादी उपलब्ध आहे.

प्रारंभी चार इस्पितळांमधून या योजनेची सुरूवात करण्यात येणार आहे, ज्यांमध्ये गोवा वैद्यकीय महाविद्यालय, दोन्ही जिल्हा इस्पितळे आणि उपजिल्हा इस्पितळ फोंडा यांचा यापूर्वीच समावेश करण्यात आला असून शुभारंभासाठी ती सज्ज आहेत. त्याचबरोबर इतर सार्वजनिक इस्पितळे तसेच खाजगी इस्पितळे यांची नोंदणी करून त्यांचा या योजनेत समावेश करण्यात येणार आहे.

दीनदयाळ स्वास्थ्य सेवा योजनेतील सर्व ४४७ उपचारांचा समावेश प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेमध्ये समाविष्ट केलेल्या सर्व खाजगी इस्पितळांमध्ये त्याच दरामध्ये निर्धारित करण्यात येईल. त्याचप्रमाणे, १५०९ ची अंतिम यादी आणि प्रधानमंत्री जन आरोग्य याजने अंतर्गत सर्व पॅकेज सार्वजनिक इस्पितळांमध्ये उपलब्ध करण्यात येईल. आरोग्य मित्रांना प्रशिक्षण देउन सर्व चार इस्पितळांमधील पॅनलमध्ये त्यांचा समावेश करण्यात येईल.

आरोग्य मित्रांशी संपर्क साधून लाभार्थ्यांना या योजनेत समाविष्ट इस्पितळांमधून सेवांचा लाभ घेता येईल तसेच या सर्व इस्पितळांच्या दीनदयाळ स्वास्थ्य सेवा योजना/प्रधानमंत्री जन आरोग्य योजने च्या कुटीरांमध्ये ती उपलब्ध असेल. नोंदणी आणि इ-कार्ड किंवा गोल्डन रेकॉर्ड तयार करण्यासाठीही लाभार्थ्यांनी आरोग्य मित्रांशी संपर्क साधावा.

 

मा/सप/टीएसएस/जॉआ/पांना/पपा/२०१८/१५७५

 

TOP