Home »News

नारी शक्ती पुरस्कारासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत
कर्तृत्ववान महिला, संघटना, संस्था यांना राष्ट्रीय नारीशक्ती पुरस्काराने सन्मानित करून महिला आणि बाल विकास खात्यातर्फे आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्यात येणार आहे.
सदर नारी शक्ती पुरस्कारात ४० नारी शक्ती पुरस्कारांचा समावेश असेल आणि तो २०१८ पासून प्रतिवर्षी ८ मार्च रोजी होणाऱ्या आंतरराष्ट्रीय महिला दिनी प्रदान करण्यात येईल. प्रमाणपत्र आणि रोख असे या पुरस्काराचे स्वरूप असून तो कर्तृत्ववान किंवा असाधारण संस्था किंवा संघटना आणि व्यक्तींना प्रदान करण्यात येईल.
नामांकनासाठी पात्रतेचे निकष खालील प्रमाणे आहेतः-
हा पुरस्कार सर्व व्यक्ती आणि संस्थांकरीता खुला असेल. व्यक्तीगत स्तरावरील पुरस्कारासाठी पात्र व्यक्तीचे वय नामांकन प्राप्त होण्याच्या दिनांका पर्यंत किमान २५ वर्षे असावे. जर अर्जदार एखादी संस्था असेल तर ती संबंधित क्षेत्रात किमान पाच वर्षे कार्यरत असली पाहिजे. अर्जदाराला वरील पुरस्कार पूर्वी प्राप्त झालेला नसावा (मंत्रालयाच्या स्त्री शक्ती पुरस्काराचाही समावेश). आर्थिक आणि सामाजिक क्षेत्रामध्ये महिला सशक्तीकरणाच्या कार्यात असाधारण परिस्थितीत उल्लेखनिय कामगिरी करणार्या व्यक्ती/गट/संस्था/बिगर सरकारी संस्था इ. यांना नारीशक्ती पुरस्कार प्रदान कण्यात येईल.
महिलांना निर्णय घेण्याच्या भूमिकेत भाग घेण्यासाठी प्रोत्साहन दिलेल्या, पारंपरिक आणि अपारंपरिक क्षेत्रात महिलांच्या कौशल्य विकासाला चालना दिलेल्या, ग्रामीण महिलांना प्राथमिक सुविधा उपलब्ध करून दिलेल्या तसेच विज्ञान आणि तंत्रज्ञान,क्रिडा, कला, संस्कृती इत्यादी अपारंपरिक क्षेत्रांत महिलांना प्रोत्साहन दिलेल्या व्यक्ती/गट/संस्था/बिगर सरकारी संस्था यांना नारीशक्ती पुरस्कार प्रदान करण्यात येईल.
नामांकनासाठी पात्र महिला, संघटना, संस्थांनी http://www.wcd.nic.in या महिला आणि बाल विकास मंत्रालयाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या निर्धारित प्रारूपातील अर्ज डाऊनलोड करून पूर्ण भरलेल्या स्थितीत संलग्नकांसह, महिला आणि बाल विकास संचालनालय, शिक्षण खात्याची जुनी इमारत, २रा मजला, १८ जून मार्ग, पणजी गोवा येथे ३० सप्टेंबर २०१८ या दिवशी किंवा त्यापूर्वी पाठवावेत. अर्ज स्वीकारण्याच्या अंतिम तारखेनंतर आलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
मा/सप/टीएसएस/जॉआ/पांना/रापे/२०१८/१५६२

 

TOP