Home »News

राज्यपालांकडून गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा

दि. १२ सप्टेंबर २०१८
भाद्र २१,१९४०

गोव्याच्या राज्यपाल डॉ. (श्रीमती) मृदुला सिन्हा यांनी १३ सप्टेंबर २०१८ रोजी होणार्याय गणेश चतुर्थीच्या निमित्ताने गोव्यातील समस्त जनतेला हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.
आपल्या संदेशात राज्यपाल म्हणतात, संपूर्ण गोव्यात आणि देशात गणेश चतुर्थी हा उत्सव श्री गणेश यांच्या जन्मदिना निमित्ताने मोठ्या उत्साहाने आणि भक्तीभावाने साजरा करतात. आम्हा सर्वांना माहित आहे की, श्री गणेश अरिष्ठांना दूर करतात, अडथळ्यांवर मात करतात आणि आपल्या जीवनात सुखसमृध्दी आणतात म्हणून आपण कुठल्याही शुभकार्याची सुरूवात करण्यापूर्वी पहिल्यांदा श्री गणेशाची पूजा करतात. ते कला आणि विज्ञानाचे स्वामी असून त्यांना आपण एक ज्ञानी वृत्तीचे म्हणून ओळखतो.
राज्यपाल पुढे म्हणतात की, घरा-घरामध्ये गणरायाचे आगमन होताच एक वेगळ्याच प्रकाराचा आनंद आणि उत्साह मनामध्ये संचारतो. गोव्यामध्ये मोठ्या भक्तीभावाने आणि उत्साहाने साजरा केला जाणारा हा उत्सव आहे. या गणेशोत्सवाच्या काळात राज्यातील कानाकोपर्यानत सार्वजनिक गणेश मूर्तींचे पूजन केलेले आपल्याला दिसून येते.त्यातून आपल्याला गोव्याच्या एकात्मतेचे आणि सलोख्याचे दर्शन घडते. स्वातंत्र्यसैनिक लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेश उत्सवाची सुरूवात प्रथम केली होती. सर्व भारतीयांना संघटित करण्याची गरज त्यांना दिसली आणि सर्वांना एकत्र आणण्याच्या हेतूने सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरूवात त्यांनी केली. देशातील विविध धर्मांतील, जातींतील लोकांना एकत्र आणण्यासाठी त्यांनी गणेश चतुर्थी हा उत्सव राष्ट्रीय उत्सव म्हणून लोकप्रिय केला. अशाप्रकारे, या उत्सवानिमित्त सर्व जाती, धर्मातील, समुदायातील लोक एकत्र येऊन, प्रत्येकजण मोठ्या उत्साहाने सहभाग घेऊ लागले.
लोकांमध्ये सदिच्छा, मित्रत्वाची आणि एकतेची भावना निर्माण करण्यास गणेश चतुर्थी सारखा उत्सव हा योग्य प्रसंग असून राज्यात सलोखा टिकवून ठेवण्यास आपल्याला मदत करतो, असे राज्यपाल आपल्या संदेशात शेवटी म्हणतात.
मा/वाप/टीएसएस/रना/अगां/२०१८/१५४०

TOP