Home »News

छायापत्रकार संघटनेतर्फे जागतिक छायाचित्र दिन साजरा

ता. 27 ऑगस्ट २०१८

        भाद्र 5,१९४०

 

          जागतिक छायाचित्र दिनानिमित्त आणि गोवा छायापत्रकार संघटनेच्या 11व्या वर्धापनदिनानिमित्त, छायापत्रकार संघटनेतर्फे कला व संस्कृती संचालनालयाच्या साहाय्याने छायाचित्र प्रदर्शन व पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. पाटो येथील संस्कृती भवनच्या बहुद्देशीय सभागृहात हा कार्यक्रम झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कला व संस्कृती मंत्री श्री. गोविंद गावडे उपस्थित होते. कला व संस्कृती संचालनालयाचे संचालक श्री. गुरूदास पिळर्णकर हे सन्माननिय अतिथी म्हणून उपस्थित होते. उपसंचालक श्री. अशोक परब,  छायापत्रकार संघटनेचे अध्यक्ष श्री. संदीप देसाई, सचिव श्री. आतिश नाईक व खजिनदार श्री. कैलास नाईक हे ही यावेळी उपस्थित होते.

          सुरूवाती, मंत्र्यांनी छायापत्रकार संघटनेच्या सदस्यांनी टिपलेल्या व संघटनेने आयोजित केलेल्या छायाचित्र स्पर्धेतील स्पर्धकांनी टिपलेल्या छायाचित्रांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन केले. यावेळी बोलताना मंत्र्यांनी लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून समाजाला दिलेल्या योगदानासाठी छायापत्रकार संघटनेच्या सदस्यांचे कौतुक केले. आजकाल सर्वजण मोबाईलवर फोटो काढतात. तथापि, छायापत्रकार हे संकटांच्या परिस्थितीत सुध्दा छायाचित्र काढतात. छायाचित्रातील नेमकेपणा हे त्यांचे कौशल्य आहे. जीवंत चित्रे टिपून छायापत्रकार दुव्याचे काम करतात.

          स्पर्धेत सहभागी झालेल्या स्पर्धकांची प्रशंसा करून श्री. गावडे यांनी त्यांना प्रामाणिकपणा, व्यावसायिकपणा व हुशारीने कठोर परिश्रम करण्यास सांगितले. तसेच छायाचित्र स्पर्धेसाठी चांगले विषय निवडल्याबद्दल त्यांनी संघटनेचही प्रशंसा केल. गोव्यातील पारंपरिक खेळ, गोव्यातील ठिकाणे यासारखे विषय आमच्या ज्ञानात भर घालून, आम्हाला राज्याच्या इतिहासाबद्दल माहिती देतील, असे ते म्हणाले.

          त्पूर्वी, मंत्र्यांनी व इतर मान्यवरांनी छायाचित्र स्पर्धेच्या विजेत्यांना बक्षीसे प्रदान केली. ही स्पर्धा शालेय विभाग व खुला विभाग अशा दोन विभागांमध्ये घेण्यात आली होती. शालेय विभागासाठी गोव्यातील पारंपरिक खेळ  हा विषय, तर खुल्या विभागासाठी गोव्यातील ठिकाणे हा विषय देण्यात आला होता. शालेय विभागातील विजेते पुढीलप्रमाणे – प्रथम – कु. आरिफ नदाफ (सारस्वत विद्यालय, म्हापसा), द्वितीय – कु. मेघराज आकरकर (व्ही.डी. व एस.व्ही. वागळे हायस्कूल, मंगेशी), तृतीय – कु. उर्वी कांबळी (बालभारती विद्यामंदिर हायस्कूल, रायबंदर), उत्तेजनार्थ प्रथम – कु. अर्नान जोनाथन डायस, उत्तेजनार्थ द्वितीय – कु. अंशुल कटारे.

          खुल्या विभागात प्रथम – श्री. वैभव दयानंद भगत, द्वितीय – श्री. अरूणब भट्टाचार्जी, तृतीय – डॉ. गौरोश गांजेकर, उत्तेजनार्थ प्रथम – श्री. संजीव सरदेसाई, उत्तेजनार्थ द्वितीय – श्री. सनत शिरोडकर यांना बक्षीसे प्राप्त झाली.

          छायापत्रकारितेच्या क्षेत्रात अतुलनीय योगदान दिल्याबद्दल मडगाव येथील श्री. नारायण फोंडेकर व म्हापसा येथील श्री. गुरूदास वायंगणकर या ज्येष्ठ छायापत्रकारांचा मंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच, संघटनेचे माजी अध्यक्ष श्री. उमेश बाणस्तारकर, श्री. सोयरू कोमरपंत, श्री. कैलास नाईक, श्री. आतिश नाईक व श्री. गणेश शेटकर यांनाही मंत्र्यांच्या हस्ते स्मृतिचिन्हे प्रदान करण्यात आली.

          संघटनेचे अध्यक्ष श्री. संदीप देसाई यांनी स्वागत केले. श्री. पिळर्णकर यांनीही यामेळी आपले मनोगत व्यक्त केले. श्री. गुरूदास वायंगणकर यांनी आपले अनुभव सांगितले. श्री. गणेश शेटकर यांनी सूत्रसंचालन केले व आभार मानले.

मा/वाप/टीएसएस/रना/रेधु/२०१८/१४७८

 

TOP