Home »News

खासदार निधीतून कुडणे हायस्कूलसाठी संगणक प्रदान

फेब्रुवारी ०१,२०१९

माघ १२, १९४०

आजचे युग हे माहिती आणि तंत्रज्ञान विकसीत युग आहे. जगाच्या प्रवाहाबरोबर स्वतःचा विकास करायचा असेल तर संगणक ज्ञान ही काळाजी गरज आहे असे प्रतिपादन केंद्रीय आयुष मंत्री श्री. श्रीपाद नाईक यांनी केले.

कुडणे येथील महालक्ष्मी हायस्कूलसाठी खासदार निधीतून निधीतून संगणक, कॉपियर, लॅपटॉप प्रदान करतानाच्या विशेष कार्यक्रमात ते बोलत होते. २०१४ ते आजतागायत साधारण ९० हून अधिक शाळा कॉलेजमध्ये खासदार निधीतून संगणक देण्यात आले आहेत व काही प्रस्ताव प्रक्रियेत असून उचित कागद पत्रांची पडताळणी झाल्यानंतर त्यांचे वितरण करण्यात येईल. उत्तर गोव्यातील जवळजवळ सर्व शाळांना या योजनेचा लाभ झाला असून त्यामुळे विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचे सखोल ज्ञान होईल ही आनंदाची आणि समाधानाची बाब आहे असे त्यांनी नमूद केले.

सभापती प्रमोद सावंत यांनी संगणक साक्षरतेबद्दल विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांना तंत्रज्ञान्याचे महत्व पटवून दिले. शालेय अवस्थेत असतानाच संगणकाचे ज्ञान करून घेणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले, तसेच या खासदार निधीतून मिळत असलेल्या योजनेचा लाभ सर्वांनी घेण्याचे आव्हानही त्यांनी यावेळी केले.

प्रारंभी महालक्ष्मी हायस्कूल संस्थेचे अध्यक्ष संतोष मलिक यांनी सर्वांचे स्वागत तथा प्रास्ताविक केले. यावेळी व्यासपीठावर उत्तर गोवा जिल्हा पंचायत अध्यक्ष अंकिता नावेलकर, पालक शिक्षक संघाचे अध्यक्ष सुरेश कामत तसेच शाळेचे मुख्याध्यापक निलेश गुणाजी उपस्थित होते.

मा/वाप/एनएन/जॉआ/मागा/२०१९/३१

 

TOP