मुख्यमंत्र्यांच्या हस्ते म्हापसा नवीन बस स्थानकाची पायभरणी

तारीख : १० फेब्रुवारी २०२१
माघ २१, १९४२

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते म्हापसा येथे बांधण्यात येणार्‍या नवीन बस स्थानकाची आज पायभरणी करण्यात आली. या प्रसंगी म्हापश्याचे आमदार तसेच जीएसआयडीसीचे उपाध्यक्ष श्री. जोशूआ पीटर डिसोझा, म्हापसा नगरपालिकेचे नगराध्यक्ष आणि इतर नगरसेवक उपस्थित होते.

ग्रामपंचायत पातळीवर सुरू झालेल्या “आत्मनिर्भर भारत, स्वयंपूर्ण गोवा” या मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असून प्रत्येक गोमंतकीयाला आत्मनिर्भर बनविण्यासाठी नगरपालिका क्षेत्रातही तिचा विस्तार केला जाईल असे या वेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

या प्रकल्पाविषयी माहिती देताना ते म्हणाले की, गोवा राज्य पायभूत सुविधा विकास महामंडळाद्वारे दोन टप्प्यांमध्ये हे काम केले जाईल ज्यासाठी सुमारे ३.३१ कोटी रूपयांचा खर्च अपेक्षित असून ते सहा महिन्यांमध्ये पूर्ण होण्याचा अंदाज आहे. पहिल्या टप्प्यामध्ये मार्केट यार्डकडे जाणार्‍या रस्त्यासह इतर पायाभूत सुविधांचे बांधकाम करण्यात येईल. तर दुसर्‍या टप्प्यामध्ये बस स्थानकाचे काम हाती घेतले जाईल असेही त्यांनी सांगितले.

पर्यटक आणि आंतरराज्य बसेसमधून येणार्‍या प्रवाशांसाठी पूर्वी निवारा किंवा स्वच्छतागृहांची व्यवस्था नव्हती. त्यामुळे नवीन बस स्थानकाचा विकास त्यांच्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. आम्ही टॅक्सी, मोटरसायकल पायलट, ऑटो रिक्षा यांच्यासाठी पहिल्या टप्प्यामध्ये सुविधा निर्माण करण्याची तरतूद केली आहे असेही ते म्हणाले.

एकेकाळी म्हापसा हे सर्वात मोठी बाजारपेठ असलेले व्यापाराचे केंद्र होते, पण तिथे पायाभूत सुविधा नसल्याने त्याचा विकास हवा तसा झाला नाही. आम्ही म्हापश्याचा सर्वांगिण विकास करून त्याचे वैभव त्याला पुनर्प्राप्त करून देणार आहोत असेही मुख्यमंत्री पुढे म्हणाले.
मुख्यमंत्र्यांनी पोट निवडणुकांच्या वेळी दिलेले आश्वासन पूर्ण केले असून म्हापसेकरांचे स्वप्न अखेर पूर्णत्वास येत आहे असे याप्रसंगी बोलताना आमदार डिसोझा यांनी सांगितले. या प्रकल्पामध्ये कदंबा कार्यालय, चालक कक्ष, कॅन्टीन, ११ टेम्पो पार्किंग, ५० बस बे, प्रवाशांसाठी निवारा, ४४ चार चाकींसाठी जागा, ६४ दुचाकींसाठी, १५ ऑटो रिक्शांसाठी पार्किंग स्लॉट्स, शौचालय सुविधा, मार्केट यार्डकडे जाण्यासाठी ७ मीटर रूंद रस्ता, पेविंग आणि हायमास्ट दिव्यांची सोय असेल असेही त्यांनी सांगितले.
मा/वाप/सुके/प्रना/पांना/ २०२१/१६०

Skip to content