सिल्वेरांच्या हस्ते कृषी मेळ्याचे उद्घाटन

तारीख : ०९ फेब्रुवारी २०२१
माघ २०, १९४२

आमदार आणि एनजीपीडीएचे चेअरमन श्री. फ्रान्सिस्को सिल्वेरा यांनी कृषी संचालनालयातर्फे सॉईल हेल्थ कार्ड स्किम(आत्म निर्भर भारत स्वयंपूर्ण गोवा) अंतर्गत नेवरा येथे आयोजित केलेल्या कृषी मेळ्याचे उद्घाटन केले.

भविष्यामध्ये शेती करण्यासाठी जमीनीचे संवर्धन करणे गरजेचे असल्याचे श्री सिल्वेरा यांनी आपल्या भाषणात अधोरेखित केले. घातक रासायनिक खतांच्या अति वापरामुळे जमीनीची सुपीकता नष्ट होत असल्याचेही त्यांनी नमूद केले. त्याचप्रमाणे उत्पादन वाढविण्यासाठी आणि जास्त फायदा मिळविण्याच्या दृष्टीने शेतकर्‍यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा असेही त्यांनी सांगितले.

लोकांच्या आणि जमीनीच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी सेंद्रिय शेतीचा अवलंब करावा असा सल्लाही श्री. सिल्वेरा यांनी दिला. त्याचबरोबर शेतकर्‍यांना अडचणींच्या वेळी मदत करण्यासाठी आणि त्यांना शेती करण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी सहकार्य करावे अशा सूचना त्यांनी अधिकार्‍यांना केल्या.

स्थानिक शेतकर्‍यांच्या भल्यासाठी नेवरा येथे कृषी मेळाव्याचे आय़ोजन केल्याबद्दल त्यांनी कृषी खात्याचे अभिनंदन केले. यानंतर परंपरागत कृषी विकास योजने अंतर्गत आयोजित केलेल्या स्पर्धेमध्ये यशस्वी झालेल्या व्यक्तींना श्री. सिल्वेरा यांच्या हस्ते प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली.

याप्रसंगी बोलताना कृषी खात्याचे संचालक श्री. नेविल आल्फोन्सो म्हणाले की, जमीनीच्या आरोग्याच्या महत्वावर भर देणे हा या कृषी मेळावा आयोजित करण्यामागचा हेतू असल्याचे सांगितले. खतांचा अतीवापर जमीनीची सुपीकता नष्ट करतो. त्यासाठी भविष्यामध्ये जमीनीची सुपीकता टिकविण्यासाठी जमीनीचे आरोग्य सांभाळावे असे त्यांनी शेतकर्‍यांना आवाहन केले. जमीन, पर्यावरण आणि आपले आरोग्य सांभाळण्यासाठी सेंद्रिय शेतीकडे वळावे असा सल्लाही त्यांनी शेतकर्‍यांना दिला.

सल्लागार श्री. काशिनाथ नाईक यांनी सहभागी शेतकर्‍यांना कृषी खात्याच्या विविध योजनांविषयी माहिती दिली. त्यांनीही सेंद्रीय शेतीच्या फायद्यांवर भर देऊन त्यामुळे जमीनीचे आरोग्य कसे सुधारेल याचे महत्व विषद केले. शेतकर्‍यांच्या हितासाठी शेतकरी आणि उत्पादक संस्थांचे महत्वही त्यांनी अधोरेखित केले.

यावेळी स्थानिक महिला शेतकरी श्रीमती अनुजा डिचोलकर यांनी भाजी मळा पिकवून आपण कशाप्रकारे एक यशस्वी शेतकरी झालो याविषयीचा आपला अनुभव कथन केला. सहाय्यक
कृषी संचालक श्री. किशोर भावे यांनी किटक नाशकांचे व्यवस्थापन करून कशाप्रकारे पिकांची नासाडी थांबवता येते याविषयी माहिती दिली. नारळ, काजू, आंबा, केळी आणि इतर पिकांना नष्ट करणार्‍या विविध किटकांविषयीही त्यांनी माहिती दिली.

केमिस्ट श्री विश्वास शिरोडकर यांनी माती परिक्षणाचे महत्व विषद करून सेंद्रिय शेतीद्वारे आपल्या आरोग्याची निगा राखण्यावर भर दिला.

आगशी ग्रामपंचायतीचे सरपंच श्री. झेवियर ग्रासियस यांचेही याप्रसंगी भाषण झाले. कृषी उपसंचालक एटीएमए श्री. दिलीप परांजपे, जिल्हा परिषद, सदस्य श्री. धाकू मडकईकर, नेवराच्या सरपंच श्रीमती उषा नाईक, कुडका बांबोळी ग्रामपंचायतीच्या सरपंच श्रीमती वेरोदिना डिसोजा, शिरदोन पाळेचे सरपंच श्री. जगदिश गोपाळ गावस, प्राचार्य रामराव वाघ हेही याप्रसंगी उपस्थित होते.

तिसवाडी तालुका विभागीय कृषी अधिकारी श्रीमती रोशेल फर्नांडीस यांनी उपस्थितांचे स्वागत केले.

मा/वाप/सुके/प्रना/पांना/ २०२१/१५८

Skip to content