Home »News

गोवा पोलिसांतर्फे व्हॉट्सऍप ऍडमिन्ससाठी कोविड-१९ विश्व महामारी दरम्यानसाठीच्या सूचना

 

पणजी, एप्रिल ९, २०२०

सध्याच्या कोरोना विषाणू संकटाच्या काळात खोट्या बातम्या, चुकीची माहिती व द्वेषपूर्ण भाषणांसारखे संदेश पसरविण्यासाठी व्हॉट्सऍप इ. सारख्या सोशल मीडिया व्यासपीठांचा वापर केला जात असल्याचे गोवा पोलिसांच्या निदर्शनास आले आहे. या अनुषंगाने ग्रुपचे ऍडमिन्स आणि सोशल मीडियाचा वापर करणार्‍या प्रत्येकाला हे व्यासपीठ जबाबदारीने वापरण्याचा सल्ला देण्यात आला आहे. 

पोलिसांनी पुढीलप्रमाणे सूचना केल्या आहेत –

१.    खोट्या बातम्या, द्वेषपूर्ण भाषणे किंवा चुकीची माहिती ग्रुपवर पोस्ट करू नका.

२.    तुम्हाला आक्षेपार्ह वाटलेली किंवा ऍडमिनने निदर्शनास आणून दिलेली कोणतीही पोस्ट त्वरित डिलिट करा.

३.    ग्रुपच्या इतर सदस्यांकडून मिळालेली अशा प्रकारची कोणतीही बातमी पुढे फॉरवर्ड करू नका किंवा पसरवू नका.

४.    तुम्हाला मिळालेली कोणतीही बातमी/फोटो/व्हिडीओ/मिम ग्रुपवर पोस्ट करण्यापूर्वी त्याचे मूळ आणि सत्यता पडताळून पाहा.

५.    तुम्हाला कोणतीही चुकीची माहिती, खोटी बातमी किंवा द्वेषपूर्ण भाषण आढळून आल्यास www.cybercrime.gov.in या संकेतस्थळावर किंवा तुमच्या नजीकच्या पोलीस स्थानकात नोंद करा, आणि तुमच्या ग्रुप ऍडमिनलाही त्वरित कळवा.

ग्रुपच्या ऍडमिनने –

१.    ग्रुपचा प्रत्येक सदस्य हा फक्त योग्य माहिती शेअर करण्याइतपत विश्वासू व जबाबदार आहे याची खात्री करावी.

२.    ग्रुपमध्ये पोस्ट करण्याबाबतच्या नियमांची माहिती सर्व ग्रुप सदस्यांना द्यावी.

३.    आक्षेपार्ह माहिती शेअर करण्याबाबत सर्व सदस्यांना इशारा द्यावा व त्यापासून प्रतिबंध करावा.

४.    ग्रुपवर शेअर करण्यात आलेली माहिती सक्रियरित्या व नियमित तपासावी.

५.    ग्रुप अनियंत्रित होत असल्यास, ग्रुपचे सेटिंग हे फक्त ऍडमिन ग्रुपवर पोस्ट करू शकतो असे करावे, असे सूचविण्यात आले आहे.

६.     कोणत्याही सदस्याने खोडकरपणे आक्षेपार्ह माहिती शेअर केल्यास पोलिसांना कळवावे.

वरील सूचनांचे उल्लंघन केल्यास त्याचे परिणाम पुढीलप्रमाणे असतील –

अशा प्रकारची आक्षेपार्ह माहिती पोस्ट करणार्‍या ऍडमिन तसेच सदस्यांना माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या (आयटी कायदा) कलम ६६सी अन्वये शिक्षा देण्यात येईल, जो ओळखीचा गैरवापर केल्याप्रकरणी शिक्षा देतो. कोणत्याही व्यक्तीने फसवेगिरी करून किंवा बेईमानी करून कोणत्याही व्यक्तीची इलेक्ट्रॉनिक सही, पासवर्ड किंवा इतर विशिष्ट ओळखीची खूण वापरल्यास, त्याला तीन वर्षांपर्यंतच्या तुरूंगवासाची शिक्षा ठोठावण्यात येऊ शकते आणि रू. एक लाखापर्यंतचा दंडही होऊ शकतो, असे हे कलम सांगते. माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६६डी अन्वये संगणक स्रोतांच्या वापराद्वारे तोतयेगिरी करून फसवणूक केल्यास तीन वर्षांपर्यंतच्या तुरूंगवासाची शिक्षा ठोठावण्यात येऊ शकते आणि रू. एक लाखापर्यंतचा दंडही होऊ शकतो.

भारतीय दंड संहितेच्या (आयपीसी) कलम १८८ नुसार सार्वजनिक कर्मचार्‍याने दिलेल्या आदेशांचे पालन न केल्यास शिक्षेची तरतूद केली आहे. तसेच, कलम १५३ए नुसार विविध समुदायांमध्ये धर्म, जात, जन्मठिकाण, निवास, भाषा इ. वरून वैर निर्माण करण्याचा प्रयत्न केल्यास आणि सलोखा बिघडविणारी कृत्ये केल्यास तीन ते पाच वर्षांपर्यंतचा तुरुंगवास व दंड अशा शिक्षेची तरतूद आहे. कलम १५३बी हे राष्ट्रीय एकात्मतेला बाधक ठरणार्‍या विधानांना शिक्षा देऊन कोणत्याही व्यक्तीचा वर्ग व राष्ट्रीय एकात्मतेला सुरक्षा प्रदान करते. कलम २९५ए हे कोणत्याही वर्गाच्या धर्माचा किंवा त्याच्या धार्मिक मान्यतांचा अपमान करून धार्मिक भावना भडकविणार्‍या कृतींना शिक्षा देते. कलम ५०५ हे सामाजिक शांततेचा भंग करण्याच्या दृष्टीने पसरविण्यात आलेल्या अफवा, खोट्या बातम्या याविरोधात शिक्षा देते. आपत्ती व्यवस्थापन कायद्याच्या कलम ५४ नुसार रोगाच्या तीव्रतेसंदर्भात दिशाभूल करणारी माहिती दिल्यास/पसरविल्यास, त्या व्यक्तीला एक वर्षापर्यंतचा तुरुंगवास किंवा दंड अशी शिक्षा होऊ शकते. फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ (सीआरपीसी) च्या कलम १४४ व कलम १४४ (३) अन्वये जिल्हा न्यायदंडाधिकारी अशा प्रकारच्या व्हॉट्सऍप ग्रुपच्या विरोधात आदेश जारी करू शकतात. या आदेशाद्वारे व्हॉटस्ऍप ग्रुपचे सेटिंग हे बदलून ते फक्त ऍडमिनला/मालकाला संदेश पाठविता येऊ शकतात, असे केले जाऊ शकते (असे केल्यानंतरही, जर खोटे, कोणत्याही धर्माचा अपमान करणारे, द्वेष पसरविणारे संदेश ग्रुपवर पाठविल्यास, त्यासाठी ऍडमिन/मालकाला  जबाबदार धरले जाईल.)

धर्म, राष्ट्रीयता, जात, भाषा व इतर प्रकारांवर आधारित वैर निर्माण करून समाजव्यवस्था, सभ्यता, नैतिकता बिघडविणारे कोणतेही संदेश, माहिती, फोटो किंवा छायाचित्रे, व्हिडीओ पोस्ट करू नये अशी विनंती सर्व नागरिकांना करण्यात आली आहे.

या संकटसमयी जो कोणी अफवा पसरवेल आणि धार्मिक समुदायामध्ये भिती आणि अशांततेची स्थिती निर्माण करेल अशा प्रत्येक व्यक्तीविरूद्ध कायद्यानुसार कायदेशीर कारवाई करण्याचे अधिकार कायदा अंमलबजावणी यंत्रणांना आहेत. कायद्यानुसार गुन्हेगारांना पकडले जाईल आणि कायद्याच्या प्रतिबंधात्मक कलमांनुसार कोणतेही उल्लंघन केल्यास त्यांच्यावर कठोरपणे कारवाई केली जाईल. सोशल मीडिया जबाबदारीने वापरा. विश्वास ठेवण्यापूर्वी किंवा फॉरवर्ड  करण्यापूर्वी त्या मजकूराची सत्यता तपासा. खोट्या बातम्या आणि द्वेषयुक्त संदेशांना नकार द्या. चला,          कोविड -१९ विरुद्ध एकत्रितपणे लढा देऊ. घरी राहा सुरक्षित राहा.

 

डीआय/एनबी/पीएन/डीएसके/पीएन/२०२०/१८२१

 

 

 

TOP